Friday, 2 January 2026

राजगड तोरणा लिंगाणा रायगड

 गणपतीनंतर नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. मागच्या वर्षी आम्ही किल्ले साल्हेर आणि सालोटा केले होते त्यामुळे यावर्षी किल्ले मुल्हेर मोरा हरगड करण्याचा बेत चालू होता. पण काही मुलांनी यावेळेस किल्ले राजगड तोरणा रायगडचे व्हिडिओ बघितले होते. त्यामुळे यावर्षी किल्ले राजगड तोरणा रायगड हा ट्रेक करण्याचे दिवाळीपर्यंत नक्की करण्यात आले. पहिले हा ट्रेक २५ डिसेंबर रात्री निघून २८ डिसेंबर रात्री परत येण्याचे आम्ही ठरवले होते. तीन दिवसात ट्रेक आरामात होणार होता. पण माझ्या काही मित्रांनी हा ट्रेक आधी केला होता त्यामुळे मी त्यांचा सल्ला घेतला तर तेव्हा त्यातील मनिष आणि विक्रम यांनी मला किल्ले तोरणा नंतर किल्ले रायगडला जायला ३ वाटा सांगितल्या आग्याची नाळ, बोराट्याची नाळ, सिंगापूर नाळ. सिंगापूर नाळ त्यात थोडी सोपी, बोराट्याची नाळ थोडी कठीण आणि आग्याची नाळ त्यात जास्त कठीण आहे असे सांगितले पण हा ट्रेक करायला दोन दिवस पुरेसे आहेत हेदेखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे किल्ले राजगड तोरणा रायगड बोराट्याची नाळ मार्ग असा ट्रेक २५ तारखेला रात्री निघून २७ तारखेला रात्री परत येत करायचा असे ठरवले. मनिषने ही ट्रेकला येण्याची तयारी दर्शवली. २७ ला परत येत असल्यामुळे आदित्य जो कॅन्सल झाला होता तो यायला तयार झाला. पण यावर्षी बरीच मुले काहीना काही कारणांनी कमी झाली होती. तरी नाही म्हणता म्हणता १३ जण झालो होतो. ऋषीचे तीन मित्र येतो म्हणाले त्यामुळे १६ जण झालो. ट्रेकच्या १५ दिवस आधी मी पुन्हा ग्रुपवर सगळ्यांच कन्फर्म करण्यासाठी मेसेज केला. तेव्हा अक्षयने मला मेसेज केला, 'दादा काही कारणास्तव मला या ट्रेकला यायला जमणार नाही.' १६ चे आता १५ झालो. ऋषीचा एक मित्र पण नाही म्हणाला. गळती लागायला सुरुवात झाली होती पण इतके वर्षांचा अनुभव असल्यामुळे शेवटी मला माहित होते जास्तीत जास्त १४ -१५ जण होणार त्यावर आकडा जाणार नाही. २ दिवसांनी ऋषीने सांगितले त्याचा एक मित्र फोन उचलत नाहीय. आकडा आला १३ वर आला. त्यामुळे पुन्हा हिशोब केला. आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर बुक करणार होतो. पण आता १३ जण असल्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर स्वस्त आणि आरामदायक पडते की पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून ह्याचा विचार आम्ही करू लागलो. पब्लिक ट्रान्स्पोर्टने थोडं स्वस्त पडलं असतं कदाचित पण पुढे वेळेचं सर्वच गणित आम्हाला पुढे जायला मिळणाऱ्या गाडीवर अवलंबून राहिलं असतं. गाडी वेळेवर मिळाली नाही तर वेळेचं गणित कोलमडणार होतं. मग आम्हाला २ दिवस पण कमी पडले असते. त्यामुळे आम्ही ट्रॅव्हलर बुक केली. ट्रेकला ३-४ दिवस बाकी असताना श्रेयस म्हणाला त्याचे दोन मित्र येणार आहेत. जर ते आले तर आम्हाला फायदाच होता, नाही आले तर आम्ही १३ जणांच्या हिशोबानेच गाडी बुक केली असल्यामुळे फरक पडणार नव्हता. २४ तारखेला श्रेयसचे मित्र देखील कॅन्सल झाले. त्यामुळे आमची गाडी पुन्हा १३ वरच अडकली.

‎ शेवटी एकदाचा जायचा दिवस उजाडला. सकाळी मनिष भेटला आम्ही दोघांनी जेवणाचे आणि नाश्त्याचे सामान घेतले. २० लिटर पाण्याचा बाटला मी आणि मनिषने घेतला होता. कारण आम्ही जिथे कॅम्पिंग करायचे ठरवले होते तिथे पाण्याची सोय नसल्यामुळे जेवण आणि प्यायला पाणी लागणार होते. उरलेले सामान मी आदित्य आणि ऋषीला घ्यायला सांगितले. सगळी तयारी झाली रात्री १० नंतर सगळे हळूहळू आमच्या सहनिवासातील मंदिरात जमायला लागले. १०.४५ ला महेश भाऊ ट्रॅव्हलर घेऊन आमच्या सहनिवासात आले. पटापट बॅग्स आत टाकून आम्ही सर्व सामान गाडीत भरले. ११.१५ ला श्रेयसचे वडिल विश्वास दादाच्या हस्ते गाडीसमोर नारळ वाढवून गणपती बाप्पा आणि श्री रामाला वंदन करून शिवरायांचा जयघोष करून आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

 डोंबिवलीहून निघून आम्ही तळोजा मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. जसे आम्ही तळोजामध्ये गेलो तसे समोर भयंकर ट्रॅफिक झाले होते. एवढे ट्रॅफिक दिवसा पण येथे नसते ते रात्री १२ च्या सुमारास होते. आम्ही विचारच करत होतो आता आम्हाला पोहोचायला बराच उशीर होणार पण तेवढ्यात महेश भाऊंनी गाडी उजव्या बाजूला असलेल्या एका गल्लीत फिरवली आणि गल्ली बोळातून नेत त्यांनी गाडी ट्रॅफिक संपल्यानंतर पुढे मुख्य रस्त्याला आणली. गल्ली बोळातून जाताना आम्ही डाव्या बाजूला बघितले तर एका कंपनीला भयानक आग लागली होती आणि तिथून आगीचे आणि धुराचे लोट आकाशाला भिडत होते. त्यामुळेच आम्हाला तळोजात सुरुवातीला अग्निशमन दलाच्या काही गाड्या आणि रुग्णवाहिका जाताना दिसल्या होत्या. तेथील कर्मचाऱ्यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना करून पुढील प्रवासाला लागलो. लवकरच एक्सप्रेस वेला लागलो पण घाटाच्या सुरुवातीपासूनच भरपूर ट्रॅफिक दिसत असल्यामुळे आम्ही एक्सप्रेस वे सोडून खोपोली मार्गे खंडाळ्याला जाण्याचे आणि तिथून पुन्हा एक्सप्रेस वे पकडण्याचे ठरवले. मजल दरमजल करत आम्ही तळेगांवला फूड मॉलला पोहोचलो तिथे फ्रेश होऊन चहा नाश्ता करून आम्ही पुढील प्रवास सुरु केला. पहाटे साधारण ५.१५ च्या आसपास आम्ही किल्ले राजगडच्या पाली दरवाजाखालील पार्किंगमध्ये आलो. तिथे पुन्हा जेवढं सामान हवंय म्हणजे पाणी आणि नाश्त्यासाठी आणलेले थेपले, फरसाण, मनिषने आणलेली पुरी भाजी श्रीखंड आणि गौरवने आणलेली भाजी चपाती घेतली. सगळ्यांच्या बॅगमध्ये व्यवस्थित भरून आता नको असलेले सामान जसे टेंट, २० लिटर पाण्याचा बाटला, जास्तीचे आणलेले कपडे हे सर्व गाडीत ठेवले. आम्ही महेश भाऊंना किल्ले तोरणाच्या एका पायथ्याशी वाळंजाई दरवाज्याच्या खालती असलेल्या भट्टी गावात कसे यायचे हे समजावले कारण तिथून साधारण २० किमी आम्हाला डांबरी रस्ताच होता तो चालत बसण्यापेक्षा आम्ही तिथून मोहरी गावात (रायलिंग पठाराच्या आधीचे गाव) गाडीने जाणार होतो. आधीच आम्ही किल्ले राजगड ते तोरणा चालत जाणार होतो. हे अंतरदेखील साधारण ११-१२ किमीचे होते.

 महेश भाऊंना सर्व सूचना देऊन साधारण ५.४५ ला आम्ही पाली दरवाजामार्गे किल्ले राजगडावर जाण्यास सुरुवात केली. सकाळी ७.०० च्या आसपास आम्ही पद्मावती माचीवर सदर आहे तिथे पोहोचलो.

इथे सर्व सामान ठेऊन आम्ही येथे कोणी नाश्ता बनवून देणारे आहेत का हे पाहू लागलो. आज चक्क गडावर नाश्ता, सरबत, ताक विकणार कोणी नव्हतं. आम्ही पद्मावती मंदिरापर्यंत जाऊन बघून आलो. तिथे किल्ले राजगड प्रदक्षिणा करायला एक ग्रुप आला होता पण सरबत, ताक, नाश्ता बनवून विकणारे कोणी नव्हते. म्हणून आम्ही पद्मावती देवी, श्री रामेश्वर आणि सईबाईसाहेबांच्या समाधीला नमस्कार करून पुन्हा सदरेजवळ आलो. तिथे बसून थेपले, पुरी भाजी श्रीखंड आणि भाजी चपाती खाऊन आम्ही संजीवनी माचीकडे प्रयाण केले. साधारण ८.०० वा आम्ही संजीवनी माची अळू दरवाजामार्गे किल्ले तोरणाकडे जाऊ लागलो. ९.२० पर्यंत आम्ही कचरे मामाच्या घराच्या आधी असलेल्या डांबरी रस्त्यापर्यंत पोहोचलो. तिथून १०.३० पर्यंत कचरे मामाच्या  घराजवळ पोहोचलो. तिथे बसून पुन्हा काही थेपले, बाकरवडी खाऊन कचरे मामांकडून चहा आणि पाण्याच्या काही बाटल्या घेऊन किल्ले तोरणाच्या दिशेने जायला लागलो तेव्हा बेळगांववरून महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणे बघायला आलेला शशिकांत नावाचा एक मुलगा तेथे आला आणि त्याने आम्ही किल्ले तोरणा करून किल्ले रायगडला जाणार आहोत हे समजल्यावर आमच्या मागे यायला सुरुवात केली. १२.४५ च्या सुमारास दुपारी आम्ही किल्ले तोरणाच्या बुधला माची येथील रडतोंडी बुरुजाच्या खालती असलेल्या शिडी जवळ पोहोचलो. १.१५ च्या सुमारास आम्ही किल्ले तोरणाच्या बुधला माचीवरून वाळंजाई दरवाजा उतरायला सुरुवात केली. इथे आमच्या मागून येणाऱ्या बेळगावच्या शशीने आम्हाला तुमच्याबरोबर किल्ले रायगडपर्यंत येऊ शकतो का म्हणून मनिषला विचारले. तो एकटाच असल्यामुळे आणि त्याला येथील पायवाटा, रस्ते माहित नसल्यामुळे आम्ही ही सर्वानुमते होकार दिला. दरवाजातून खालती येताच बाजूला एक पाण्याचं डबकं दिसलं. तिथे थोडं फरसाण खाऊन पुन्हा रिकामी झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि तिथून उतरायला सुरुवात केली. इथपर्यंत आम्ही बऱ्यापैकी वेळेत होतो. पण इथून पुढे हा रस्ता अनोळखी समोर आम्हाला गाव दिसत होतं पण रस्ता एवढा निसरडा होता की काहीजण अक्षरशः घसरगुंडी करून खालती उतरले. ६० टक्के रस्ता हा असाच निसरडा होता. व्यवस्थित चालता आले असते तर आम्ही तासा दीड तासात खालती गावात पोहोचलो असतो. पण काहींचे बूट सरकत असल्यामुळे सर्वांना सुखरूप खालती नेण्यासाठी आम्ही काहीजण एकदम आरामात उतरत होतो. लवकर पोहोचण्याची घाई करण्यापेक्षा सुरक्षित पोहोचणं महत्वाचं होतं. आमच्यातील काही जण वेळेत म्हणजे साधारण ३.२० पर्यंत भट्टी गावातील वाळंजाई देवीची मूर्ती असलेल्या व्यायामशाळेजवळ आणि सांस्कृतिक भवनाजवळ पोहोचले. आम्हाला उशीर होतं होता काही जे थकले होते घसरत होते त्यांना घेऊन जाण्यात वेळ लागत होता. तो ६० टक्के निसरडा भाग संपवून आम्ही एका जंगलात घुसलो तिथला छोटा भाग पार करून पुढील भागात पोहोचलो तर तिथे मला काही मधमाश्या दिसल्या. मला जाणवलं इथे जास्त मधमाश्या असू शकतात काहीच पावलं पुढे गेलो आणि मला माझ्या डोक्यावर मधमाश्या घोंगवताना दिसल्या. (हा फोटो किल्ले राजगड येथील बाळलेकिल्याजवळून संजीवनी माचीकडे जाणाऱ्या मार्गतला आहे. इथे मी मधमाश्यांसाठी फक्त प्रतिकात्मक म्हणून हा फोटो टाकला आहे)
मी तिथेच थांबलो कारण माझ्या मागे आता फक्त ऋषी जोशी होता. जसा तो माझ्याजवळ आला मी त्याला म्हणालो,' आता काही न बोलता चुपचाप आणि पटापट हा पट्टा पार करायचा. मधमाश्या भरपूर आहेत चुकून एखाद्या मधमाशीने डंख मारलाच तरी घाबरून न जाता पायवाटेने हळूहळू पुढे जात राहायचे. पण मधमाश्या घालवण्याचा कोणता ही प्रयत्न करायचा नाही.' आम्ही हा पट्टा पार करत ५.१५ च्या सुमारास भट्टी गावात पोहोचलो.                    (श्री राम मंदिर, भट्टी गाव)
तिथे आम्ही आकाश कचरे याच्याशी संपर्क साधून जेवण मागवले होते. आमच्यायला आधी आलेल्यांची जेऊनही घेतले होते. पण आम्हाला उशीर झाल्यामुळे आमचं जेवण घेऊन आलेल्या आकाशच्या वडिलांना उशीर होतं असल्यामुळे आमच्याकडे असलेल्या डब्यांमध्ये काढून घेतले होते. आदित्यने त्यांना ठरलेले पैसे दिले आकाशचे वडिल तिथून निघून गेले होते. आदित्य बहुतेक विसरला होता की मी आकाशला काही पैसे ऍडव्हान्स पाठवले होते. बहुतेक आकाशही त्याच्या घरच्यांना सांगायला विसरला असावा. त्यामुळे तेही आदित्यने दिलेले पैसे घेऊन निघून गेले. उरलेले आम्ही  पाचजण जेऊन घेतलं. मी आकाशला सांगण्यासाठी फोन केला पण त्याचा फोन लागला नाही. म्हणून शेवटी आदित्यने मागवलेला चहा पिऊन थोडं जेवण उरलेलं ते डब्यात भरून आम्ही सर्व सामान गाडीत भरून आम्ही मोहरी गावात जाण्यासाठी निघालो. काहीच अंतर गेलो असू तेव्हा मी मेसेज बघायला लागलो तर आमचा एक मित्र संदिप भारती हा पुण्यात कामाला असतो त्याचा मेसेज होता. कुठे पोहोचलात आणि कुठे कॅम्प करणार आहात. मला लोकेशन पाठव मी यायला निघालोय. मी त्याला आम्ही जिथे कॅम्प करणार होतो त्याची लोकेशन पाठवली. पण पुढे रस्ता मातीचा आणि एकदम खराब होता. आम्हाला वाटेत दोन छोट्या चारचाकी गाड्या थांबलेल्या दिसल्या. त्यांच्या गाड्या सरकत होत्या आणि खालून गाडीला एखादा दगड वगैरे लागण्याची शक्यता होती म्हणून दोन्ही गाडीवाले तिथे रस्त्याच्या मधेच थांबले होते. आम्ही त्यांना आम्हाला रस्ता देण्यास सांगितले. तेव्हा त्यातील एका गाडीतील मुलांनी गाडी बाजूला लावून चालत पुढे जाण्यास सुरुवात केली. दुसऱ्या गाडीतील दोन मुलं आणि एक मुलगी यांनी आम्हाला पुढे मोहरी गावापर्यंत सोडण्याची विनंती केली. आम्ही ही त्यांना गाडीत घेऊन आम्ही मोहरी गावाजवळ असलेल्या सिंगापूर गावात जाणाऱ्या फाट्याला आलो तिथून मोहरी गाव ३५० मीटर होते. या सिंगापूर गावातून एक नाळ रायगड किल्ल्याला जाते त्यामुळे तिला सिंगापूर नाळ म्हणतात. पण इथून पुढे रस्ता खूपच खराब होता. आमची मोठी गाडीदेखील दगडाला आपटू शकत होती. म्हणून शेवटी सिंगापूर फाट्याजवळच गाडी उभी करून पुढे चालत कॅम्पिंगसाठी जागा शोधायला सुरुवात केली. आता मात्र आम्हाला कॅम्प करायचे असल्यामुळे टेंट, पाण्याचा बाटला, जेवण बनायचं सामान सगळंच घेऊन जायचं होतं. म्हणून आम्ही सगळे सामान घेऊन निघालो. अभी, शुभम, आदित्य आणि इतर यांनी पुढे जाऊन एका घराच्या समोर मोकळ्या जागेत टेंट लावायचे ठरवले व आम्ही शेवटी आमच्या मोठ्या बॅग आणि पाण्याचा बाटला घेऊन हळूहळू जाऊ लागलो. पहिले गौरवने पाण्याचा बाटला साधारण १५० मी. नेला. तिथून विवेकने १०० मी. नेला. शेवटचे १०० मी. मी घेऊन गेलो. आम्ही आदित्यने आणि बघितलेल्या जागेवर टेंट लावायला सुरुवात केलीच होती तेवढ्यात तिथे राहणारी एक मावशी तिथे आली आणि प्रत्येक टेंट लावायचे २०० रु मागायला लागली आमचे ४ आणि शशीचा १ असे ५ टेंट होते. म्हणजे १००० रु झाले असते. म्हणून मी मनिष आणि अजून एक दोन जण आम्ही दुसरी जागा बघायला गेलो व आदित्य गौरव त्या मावशीबरोबर वाटाघाटी करायला लागले. गावाच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागेत जिथे पार्किंग करतात तिथे आम्ही बघितलं पण तिथे गवत वाढले असल्यामुळे तिथे टेंट लावता आले नसते. आम्ही परत गावाच्या दिशेने वळलो मध्ये एका घरात जिथे मनिष आणि आधी राहिले होते तिथे विचारलं त्यांनी ही टेंट लावायला होकार दिला जे द्यायचं ते द्या म्हणाले. पण तिथेच मला आदित्यचा फोन आला, 'वाटाघाटी झाल्या आहेत या टेंट लावून घेऊ' असे तो म्हणाला. मग शेवटी आम्ही गेलो आणि टेंट लावायला घेतले.

‎ टेंट लावून झाल्यावर ऋषी जोशी आणि विवेक सिंग यांनी भाताची खिचडी बनवायला घेतली.

खिचडी होतंच आलेली तेवढ्यात संदिप त्याच्या एका ऑफिसमधल्या मित्राला तुषारला घेऊन आमच्या बरोबर कॅम्पिंग साठी आला. खिचडी तयार झाल्यावर आम्ही खिचडी आणि संध्याकाळच उरलेलं जेवण संपवलं. अगदी व्यवस्थित जेवण झालं. काहीच उरलं नाही.

मग सगळं आवरून झोपण्याची तयारी करू लागलो तेव्हा समजले आता आम्ही टेंटमध्ये मावणार नाही. तेव्हा मी, मनिष, संदिप आणि महेश भाऊ आम्ही चौघे बसमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. माझी स्लीपिंग बॅग सापडेना आता झाली ना माझी पंचाईत. शोध शोध शोधलं पण शेवटी नाहीच. मग काय तसाच बसमध्ये गेलो. बसमध्ये पण एकदा बघितलं पण तिथे ही नाही. महेश भाऊ आपली चादर घेऊन मागच्या सीटवर झोपले. त्यांच्यापुढे मी, माझ्या पुढे संदिप आणि सगळ्यात पुढे मनिष असे आम्ही झोपायला गेलो. सुरवातीला काही जाणवलं नाही पण काही वेळाने मी थंडीमुळे कुडकुडायला लागलो होतो. मधेच जाग आली तेव्हा लक्षात आलं मला थंडी वाजणं बंद झालं. मी बघितलं तर माझ्या अंगावर एक चादर व्यवस्थित घातली होती. मी उठलो महेश भाऊंकडे बघितलं ते चादर घेऊन झोपले होते. मनिष आणि संदिप स्लीपिंग बॅग घेऊन झोपले होते. त्यामुळे मी पण महेश भाऊंनीच माझ्या अंगावर त्यांची extra चादर टाकली आहे हे समजून झोपून गेलो.

 दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ ला उठलो. मी, मनिष, संदिप आम्ही गाडीतून बाहेर आलो. जिथे टेंट लावलेले तिथे जाऊन सर्वांना उठवायला लागलो.

६.३० - ६.४५ पर्यंत सगळे उठले. ७.०० वा. संदिप आणि तुषार पुन्हा १०.०० ला कामावर जायचे असल्यामुळे सर्वांचा निरोप घेऊन निघाले. आम्ही पटापट सर्व आवरून कालच्या मावशींना आम्ही आणलेलं मॅगी आणि चहाचं सामान दिलं. त्यांनी काही वेळातच मॅगी आणि चहा बनवून दिलं. मॅगी खाऊन चहा पिऊन पटापट जे सामान लागणार नाही ते सामान गाडीत घेऊन गेलो. पुन्हा फक्त खायचं सामान आणि पाणी घेऊन आम्ही ८.३० च्या सुमारास रायलिंग पठाराच्या दिशेने जायला सुरुवात केली. आता आम्ही ११ जण आणि शशीच होतो. राहुल आणि ऋषी जोशी हे गाडीतून रायगडला आम्हाला भेटणार होते. तेही ९.४५ च्या सुमारास किल्ले रायगडला जाण्यासाठी निघाले. साधारण अर्ध्या पाऊण तासात आम्ही रायलिंग पठारावर पोहोचलो. तिथे रायलिंग पठारावरून किल्ले लिंगाणावर व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगचा कार्यक्रम एका ग्रुपतर्फे ठेवण्यात आला होता. तिथे थोडा वेळ काढून पुन्हा थोडे मागे आलो जिथून आता आम्हाला किल्ले रायगडजवळ जाण्यासाठी एका नाळेतून उतरायचे होते. नाळ म्हणजे काय हे प्रथम आपण बघू. गूगल बाबा गिर्यारोहणात नाळ म्हणजे गिर्यारोहण (Trekking) आणि प्रस्तरारोहण (climbing) करताना जी दोरी वापरतो त्याला नाळ म्हणतो. एका अर्थी हे पण बरोबर आहे कारण बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा ते बाळ आईशी एका नाळेने जोडलं गेलेलं असतं आणि सुखरूप आणि सुरक्षित त्याची वाढ होते. तसेच गिर्यारोहण आणि प्रस्तरारोहण करताना गिर्यारोहणात कमी पण प्रस्तरारोहणात याचा जास्त वापर होतो. काही विशिष्ठ प्रकारच्या गाठी मारून आम्ही त्या दोरीच्या साहाय्याने पर्वतावर सुखरूप आणि सुरक्षित राहतो. पर्वतांमध्ये ही दोरी आमचं जीवन सुरक्षित करण्यात फार मोलाचा वाटा उचलते. इतरही काही वस्तू असतात ज्या महत्वाच्या असतात. पण दोरीचे महत्व काही वेगळंच आहे. पण माझं मत इथे गूगल बाबापेक्षा थोडं वेगळं आहे. इथे आग्याची नाळ, सिंगापूर नाळ, बोराट्याची नाळ अशा काही नाळी आहेत. मग इथे आग्याची दोरी, सिंगापूरची दोरी, बोराट्याची दोरी असा अर्थ होऊ शकत नाही. २० वर्ष गिर्यारोहण आणि काही वर्ष प्रस्तरारोहण केल्यामुळे मी जे काही तुटके फुटके ज्ञान मिळवले आहे त्यानुसार इथे नाळ म्हणजे डोंगरावरून पावसाळ्यात पाणी खालती वाहते तो रस्ता. काही ठिकाणी यालाच घळ, नळी, खिंड असे म्हणतात. याची उदाहरण द्यायची तर पावनखिंड, उंबरखिंड, नळीची वाट, सांधण घळ, माकड नाळ, शिवथर घळ इत्यादी. आम्ही ९.४५ च्या सुमारास या नाळीत आलो. आम्हाला हीच बोराट्याची नाळ असेल असे वाटतं होते कारण गूगल बाबा इथूनच बोराट्याची नाळ दाखवतो. त्या नाळेने आम्ही खालती यायला सुरुवात केली. साधारण ही नाळ आम्ही ४० टक्के उतरलो असू तेव्हा नाळीच्या उजव्या बाजूला दगडाला एक लोखंडी जाड अंदाजे १० फुटाचा साखळदंड बांधलेला आहे. तो पकडून एक एक करून खालती उतरलो. तिथून साधारण अजून १०-२० पावलांवर ही नाळ सोडून उजवीकडे एक वळण घेऊन रस्ता जात होता. जिथे काही खिळे (climbing bolts) मारून त्यात ६ मीमी. जाडीची प्लास्टिक आवेष्टनात असलेली लोखंडी वायर अडकवलेली होती ती पकडून अंदाजे २० ते ३० फूट चालून आम्ही एका पायवाटेला लागलो. इथून आम्हाला किल्ले लिंगाणाची प्रस्तरारोहणाची सुरुवात होते ती जागा दिसत होती. पुढील २-३ मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो. आता अंदाजे ११.३० वाजले होते. म्हणजेच आमचा ट्रेक हा किल्ले राजगड तोरणा रायगड नसून किल्ले राजगड तोरणा लिंगाणा रायगड असा होत होता. किल्ले लिंगाणाजवळ पोहोचल्यावर तिथे एका दगडावर बोराट्याची नाळ असे लिहून उजवीकडे खालती जाणारी एक नाळ दाखवत होता. जिथे गूगल बाबा आम्ही जी नाळ उतरून आलो होतो तिथून बोराट्याची नाळ दाखवत होता. तिथे थांबून आम्ही फक्त आमच्यासाठी मोहरी गावात कॅम्पिंगसाठी आलेल्या संदिप आणि तुषारने आमच्यासाठी आणलेली अप्रतिम अशी भेळ खाल्ली.

काही वेळ विश्रांती घेऊन पाणी पिऊन आम्ही १२.०० वा. पर्यंत उजव्या बाजूच्या नाळेत उतरायला सुरुवात केली. पण या नाळेत उतरायला सुरुवात करताच एक लक्षात आलं की इथे पायाखालचे दगड सरकत आहेत. त्यामुळे इथे खूप सांभाळून आणि थोडे अंतर ठेवून चालायला लागत होते. कारण एक दोनदा ६ ते ८ इंचाचे दगड घरंगळत आले होते. एवढे दगड पण गंभीर इजा करू शकतात. मी आणि मनिष सगळ्यात पुढे होतो त्यामुळे आमच्याच अंगावर येत होते. आम्ही आमची सुरक्षितता बघून हाताने अथवा पायाने अडवत होतो. यात आणखी एक गोष्ट अशी की आमच्या मागून अजून दोन ग्रुप आले होते एक ४-५ जणांचा आणि एक ७-८ जणांचा अर्थातच आमच्यापेक्षा संख्येने कमी असल्याने त्यांचा वेग आमच्यापेक्षा जास्त होता. या रस्त्याला ते आमच्या मागेच होते. त्यात त्यांना कसली घाई होती माहित नाही ते या ठिकाणी ही स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या सुरक्षिततेची काळजी न घेता पटापट उतरायला बघत होते. बरेचसे दगड हे त्यांच्या पायाखालून सुटले होते. असे नाही की आमच्या ग्रुपमधील मुलांच्या पायाखालून दगड सुटले नाहीत. पण मी, आदित्य, तेजस, विक्रम २०१९ पासून आमच्या सहनिवासातील या मुलांना गिर्यारोहणाला घेऊन जात आहोत तेव्हा पासून त्यांना सांगितले आहे की उतारावर तुमच्या पायाखालून एखादा छोटासा दगड जरी सरकला तरी 'watch out' असा जोरात कॉल द्यायचा. जेणेकरून तुमच्या पुढे असलेले तुमचे सहकारी असोत वा इतर ग्रुपमधील कोणी ते सावध होतील आणि स्वतःला सुरक्षित करतील. ४-५ वेळा मी watch out चा कॉल ऐकला असेल पण बाकी वेळेस नुसता गोंधळ ऐकू येत होता. तो रस्ता पार करून आम्हाला इथे पुन्हा मातीचा निसरडा रस्ता लागला जसा किल्ले तोरणाच्या वाळंजाई दरवाजाने उतरताना लागला होता. पण इथे हा असा रस्ता फारच थोडा होता. तो पार केल्यावर आम्हाला जसा नाळीत मोठ्या दगडांची वाट असते तशी दगडांची वाट लागली. ती वाट थोडावेळ उतरल्यावर आम्ही ही नाळ सोडून डावीकडे एकदम पुसट दिसणारी आणि पटकन लक्षात न येणारी वाट पकडली. इथे मनिष एकटाच पुढे जुनं कडसरी लिंगाणा गाव शोधण्यासाठी निघून गेला. ही वाट थोडी कमी मळलेली होती. त्यामुळे आमच्यातील काहीजणांच्या मनात शंका येऊ लागली की आपण बरोबर रस्त्याला आहोत का? पण तेव्हा मनिषने वॉकी टॉकीवर मेसेज दिला की मी जुनं कडसरी लिंगाणा गाव जे आता रिकामं झालंय तिथे पोहोचलोय. आम्ही पण हळूहळू त्या वाटेने पुढे जायला लागलो. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत मनिषने गावातील त्याला माहित असलेली विहिर शोधून ठेवली.आम्ही १.४५ पर्यंत तिथे पोहोचून विहिरीतून पाणी भरू लागलो. (जुनं कडसरी लिंगाणा गाव आणि तेथील दोन विहिरी)

तोपर्यंत अभि बिरंबोळेने त्या विहिरीच्या थोडं उजवीकडे जाऊन अजून एक विहिर शोधली जी आम्हाला माहित नव्हती. दोन्ही विहिरीतील पाणी सुंदर होते पण बरेच वर्षांपासून गावं खालती स्थलांतरीत झाल्यामुळे या विहिरींचा वापर होतं नाहीय. त्यामुळे पाण्यावर तेलकट तवंग होता. म्हणून आम्ही पाणी गाळून बाटल्यांमध्ये भरले.

‎ लागणार त्यापेक्षा थोडं जास्तच पाणी भरून आम्ही २.३० पर्यंत पुन्हा चालायला सुरुवात केली आणि आताच कडसरी लिंगाणा गाव आहे तिथे जाण्याची पायवाट पकडली. थोडं पुढे गेल्यावर आम्ही थोडे गोंधळात पडलो. कारण एक पायवाट जी जास्त मळलेली होती ती सरळ जात होती पण ती थोडी वर चढत होती. एक कमी मळलेली वाट डावीकडे खालती उतरत होती. मी सरळ वाटेला जाऊन बघायला थोडं पुढे गेलो असेन तेव्हा मला तिथे बुटांचे ठसे दिसले. त्यावरून मी समजून गेलो हीच वाट आहे. इथे मनिष थोडा मागे राहिला होता. म्हणून शुभमने त्याला वॉकी टॉकी वर विचारले,' इथे दोन वाटा आहेत. एक सरळ जाऊन वर जातेय आणि दुसरी डावीकडे खालती उतरतेय' तेव्हा मनिषने डावीकडची वाट पकडा खालती उतरणारी असे सांगितले. यामुळे सर्वांनी डावीकडची वाट पकडली. स्पष्ट दिसणारी वाट सोडून आम्ही अशी वाट निवडली जी अस्पष्ट होती. इथेच आमच्या बरोबर मोठा खेळ झाला असे मला वाटते. त्या वाटेने आम्ही बरेच खालती लवकर आलो पण खाली डोंगराचा घेर जास्त असल्यामुळे आम्हाला बराच वळसा मारायला लागतं होता पण गाव काही दिसत नव्हतं. दोन ओढे पार केल्यावर एका ठिकाणी आम्हाला खालती शेतं अगदी जवळ दिसायला लागली होती पण घरं दिसत नव्हती. इथून वाट चांगली मळलेली होती. थोडे पुढे आल्यावर पुन्हा वाट थोडी चढत होती. आता आदित्य इथूनच खाली जाऊ आणि गाव शोधू असे म्हणू लागला. बाकीचे आदित्यजवळ पोहोचेपर्यंत मी पुन्हा वर चढणाऱ्या वाटेवर थोडं पुढे जाऊन बघून येतो म्हणालो आणि त्या वाटेकडे निघालो. अगदी काही मिनिटांतच मला समोर घरे दिसायला लागली आणि जीवात जीव आला. याच वाटेने येताना मला वरून येणारी चांगली मळलेली वाट वरून खालती येत या वाटेत विलीन झालेली दिसली. आम्ही या वाटेने खालती आलो असतो तर कदाचित आमचा अर्धा पाऊण तास वाचला असता असे मला वाटते. पण असो आता त्यावर विचार करून काही उपयोग नव्हता. तेव्हा मी पटापट मागे आलो आणि सगळ्यांना पुढे यायला सांगितलं. पण इथे सगळ्यांचे पाय चालून दुखायला लागले होते त्यामुळे माझ्यावर विश्वास न ठेवता सगळे खालती उतरून जाऊ असे म्हणत होते. इथे मात्र मी आदित्यला म्हणलो, 'एकदा मी सांगतो तिथे येऊन बघ तुला समोर घरं नाही दिसली तर आपण तिथून खाली उतरू'. सगळे माझ्यापर्यंत आले सर्वांना समोर घरे दिसल्यावर सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ४.१५ च्या आसपास आम्ही गावात गेलो तिथे एका घरात आवाज दिला एक मावशी आल्या त्यांना चहा बनवून मिळेल का आणि पाणी मिळेल का ते विचारले आणि त्यांनी ही होकारार्थी मान हलवून लगेच आम्हाला कळशी भरून पाणी आणून दिले.

चहा बनेपर्यंत आम्ही आमच्याकडचे केळ्याचे वेफर्स, शेव आणि गौरवने आणलेला केक खाऊ लागलो. तिथेच काही लहान मुलं खेळत होती मग त्यांना ही आमच्यातला खाऊ खायला दिला. मावशींनी चहा आणून दिल्यावर चहा पिऊन आम्ही तिथून एका गाववाल्याला पुढचा रस्ता विचारून ५.०० वा. उतरायला सुरुवात केली. गावातून खालती उतरल्यावर आम्हाला काळ नदी लागली. नदीचं पात्र सुकलेले असल्यामुळे आम्हाला पार करण्यात कोणताही अडथळा आला नाही. लगेच आम्हाला एक डांबरी रस्ता लागला. इथे पुन्हा आम्ही एक चूक केली. आम्हाला डावीकडे वळून एक ब्रिज पारकरून मग उजवीकडे वाघेरी, वारंगे गावाच्या दिशेने वळायचे होते. पण आम्ही तसे न करता रस्त्याला लागताच उजवीकडे वळलो आणि पाणे गावाच्या दिशेने जायला लागलो. पहिले आमच्या लक्षात आलं नाही पण काही अंतर चालल्यावर मी आदित्यला म्हणालो, 'आपण चुकीच्या दिशेला जातोय. आपण आताच किल्ले लिंगाणाच्या दिशेने आलो आणि ही वाट पुन्हा त्याच दिशेला जातेय.' आम्ही मनिषला आवाज देऊन विचारलं पण तो ही हीच वाट बरोबर आहे म्हणाला. कदाचित थकल्यामुळे किंवा विसारल्यामुळे असेल तो असे म्हणाला व आम्ही त्याच दिशेने चालू लागलो. पुन्हा काही वेळ चालल्यावर  आम्हाला एक डंपर जो काही वेळापूर्वी आमच्याच बाजूने आम्ही ज्या दिशेने जातोय त्या दिशेने भरून गेला होता तो आता रिकामा येताना दिसला. आम्ही त्याला हात दाखवून थांबवले आणि आम्हाला छत्री निजामपूर गावापर्यंत सोडण्यास विनंती केली पहिले तो नाहीच म्हणाला पण आम्ही वारंवार विनंती केल्यावर १०००/- रु घेईन म्हणाला. मग त्याच्याशी वाटाघाटी करून आम्ही ८००/- मध्ये त्याला तयार केले आणि आम्ही सगळे त्या डंपरमध्ये चढलो. आम्ही सगळे चढल्यावर त्याने डंपर आम्ही ज्या दिशेने आलो होतो त्याच दिशेने नेण्यास सुरुवात केली. तेव्हा सगळेच अरे आपल्याला विरुद्ध दिशेला जायचे होते ना? असा प्रश्न विचारू लागले. तेव्हा आदित्य म्हणाला मी त्याला सांगत होतो आपणच चुकीच्या दिशेने जात होतो. आम्ही जिथून डांबरी रस्त्याला लागलो होतो तिथून काही अंतर पुढे गेल्यावर एक ब्रिज लागला आणि लगेच सरळ व उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यांपैकी उजवीकडे वळल्यावर वाघेरी आणि वारंगे गाव पुढे असल्याचा बोर्ड दिसला. वाघेरी गाव गेल्यानंतर एक मातीचा रस्ता डावीकडे वळतो. इथे आम्हाला एक मुलगा एकटा सिंहगड राजगड तोरणा रायगड करून येत असलेला भेटला. त्याला ही गाडीत घेतले. त्याचा ग्रुप होता पण एकाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे बाकीचे सगळे पाणे गावात थांबले होते. हा मातीचा रस्ता पकडून आम्ही दोनदा सुकलेल्या नद्या पार करून ५.४० च्या सुमारास छत्री निजामपूरच्या आधी ४-५ किमी आलो. इथे डंपरवाल्याने आम्हाला अजून पुढे नाही येत तुमची गाडी इथे येऊ शकेल ती इथेच मागवा असे सांगून सोडले. आम्ही पण उतरलो त्याला त्याचा मोबदला दिला आणि आम्ही महेश भाऊ, ऋषी आणि राहुल यांना फोन करू लागलो पण नेटवर्क प्रॉब्लेममुळे संपर्क होत नव्हता. बरेच वेळा आणि बऱ्याच जणांनी प्रयत्न केल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला तोपर्यंत आम्ही काही अंतर चालत पुढे चालत होतो. शेवटी वरून घाटातून गाडी येताना दिसल्यावर गाडी वळवायला पुरेशी जागा मिळेल अशा ठिकाणी आम्ही गाडीची वाट बघत थांबलो.

‎ काही वेळापासून मी छत्री निजामपूर म्हणतोय काहीजणांना वाटत असेल असे कसे गावाचे नाव? बऱ्याच जणांना हे नाव जरा विचित्रच वाटतं असेल. पूर्वी या गावाचं नाव निजामपूर होतं. मग असं काय घडलं? त्यामागे एक कहाणी आहे. काही वर्षांपूर्वी मी, आदित्य, अनिश, दिपक आणि आमच्या सहनिवसातील काही जण किल्ले रायगड बघण्यासाठी आलो होतो. तेव्हा येथे आम्हाला ज्येष्ठ इतिहास संकलक श्री. आप्पा परब भेटले होते. (इथे कृपया कोणी राग मानू नये. सगळेच आप्पांना इतिहास संशोधक म्हणतात पण आप्पा स्वतःला संशोधक न म्हणवता संकलक म्हणवतात. कारण त्यांचं म्हणणं आहे, महाराजांच्या काळातील पत्र, लेख यांचं ते फक्त संकलन करतात) टकमक टोकावर आप्पा त्यांच्याबरोबर आलेल्या ग्रुपला तेथील इतिहास सांगतच होते आणि सुदैवाने आम्ही पण तिथे पोहोचलो. तेव्हा टकमक टोकाचा इतिहास सांगताना आप्पा म्हणाले, 'एकदा महाराज (छत्रपती शिवाजी महाराज) गडावरील व्यवस्था बघत टकमक टोकाकडे आले तेव्हा महाराजांबरोबर त्यांचा लवाजमा देखील असणार त्यातच महाराजांसाठी छत्र घेऊन एक मावळा (येथे मी सेवक नाही म्हणणार कारण स्वराज्याच कोणतंही काम असो मग ते कितीही छोटं असो ते करणारा तो मावळाच) देखील महाराजांबरोबर होता. तेव्हा अचानक सोसाट्याचा वारा आला आणि या वाऱ्याबरोबर तो मावळा छत्रासहित वर हवेत भिरकावला गेला. महाराज ओरडले काही झालं तरी छत्र सोडू नकोस. या मावळ्याने ही आपल्या स्वामींची आज्ञा पुरेपूर पाळली आणि हवेबरोबर हा सुखरूप निजामपूर गावात उतरला. तेव्हापासून या गावाचे नाव छत्री निजामपूर असे झाले.

‎ अंदाजे ५.५५ वा. पर्यंत गाडी आली.

आम्ही गाडीत बसलो काही अंतरावर तो मुलगा जो आम्हाला डंपरमध्ये भेटला होता तो पुन्हा भेटला त्याला पुन्हा आम्ही आमच्या गाडीत घेतले. त्याला पाचाडला जायचे होते. आम्ही चित दरवाजाजवळ थांबलो तिथे मनिष आणि ऋषी बिरंबोळे जाऊन पायरीला डोकं टेकून आले आणि इथेच किल्ले तोरणापासून आमच्याबरोबर असलेला बेळगावचा शशी याला उतरायचे होते कारण तो किल्ले रायगडसमोरील वाघबिळ गुहेत कॅम्पिंग करून दुसऱ्या दिवशी किल्ले रायगड बघणार होता. आम्हाला रात्री १२.०० च्या आत घरी जायचे होते कारण उशिर झाला असता तर गाडीचे भाडे, ड्राइव्हरची night असा सगळाच पैशाचा हिशोब गडबड झाला असता. तसेही जवळपास सर्वांचा किल्ले रायगड बघून झाला होता. तिथून आम्ही खाली पाचाडला आलो तिथे त्या दुसऱ्या मुलाला ही उतरवले आणि आम्ही दुपारचे जेवण झाले नसल्यामुळे वडापाव घेण्यासाठी एका छोट्या हॉटेलच्या इथे थांबलो. महेश भाऊंना तिथेच खायला सांगून आम्ही आमच्यासाठी पार्सल घेतले. तोपर्यंत ७.००-७.१५ झाले मग तिथून जे निघालो ते कुठेच न थांबता पाली, इमॅजिका रस्त्याने एक्सप्रेस वेने आम्ही ११.०० वा. पर्यंत आम्ही आमच्या सहनिवासात परत आलो. येत असताना वाटेत मी आकाश कचरेला मेसेज करून त्याला आमच्याकडून १०००/- जास्त दिले गेले आहेत हे कळवले.काही वेळातच त्याचा मेसेज आला सकाळी पाठवतो सर तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मनिषला १०००/- पाठवले. आकाश कचरे हा किल्ले राजगड, किल्ले तोरणा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात उत्तम घरगुती जेवणाची सोय उपलब्ध करून देतो. (आकाश कचरे ९०६७३३६८९४) या ट्रेकला आदित्य कानेटकर, मनिष शेवडे, गौरव सावंत, अभिषेक जोशी, ऋषी जोशी, राहुल चौधरी, शुभम खुजे, अभिषेक बिरंबोळे, ऋषी बिरंबोळे, श्रेयस वैद्य, सुमित फडके, विवेक सिंग आणि मी असे १३ जण होतो.

टीप -: काहीजणांना वाटेल आम्ही किल्ले राजगड, किल्ले तोरणा, किल्ले लिंगाणा, किल्ले रायगड हा ट्रेक केला पण किल्ले राजगड व तोरणा नुसते चढून उतरलो किल्ले बघितलेच नाहीत आणि किल्ले लिंगाणा व किल्ले रायगड चढलोच नाही. तर अश्या range ट्रेकला किल्ले बघायला वेळ नसतो. या किल्ल्यांमधील वाटा करायच्या असतात. किल्ले बघून जर हा ट्रेक करायचा असेल तर किमान एक आठवडा तरी लागेल.

Thursday, 20 November 2025

स्नेह मेळावा १०वी/ब १९९७ स. वा. जोशी विद्यालय

 राहायला डोंबिवलीमधील सारस्वत कॉलनीत त्यामुळे प्राथमिक शिक्षण शिशुकुंज शाळेत आणि पुढे माध्यमिक शिक्षण स. वा. जोशी विद्यालय येथे झाले. प्राथमिक शाळेत शिक्षण घेताना बरेच मित्र लाभले. प्राथमिक शाळेतील बरेचशे मित्र माध्यमिक शाळेत दुसऱ्या वेगवेगळ्या वर्गात गेले पण काही माझ्या वर्गात होते. शिशुकुंज शाळेत आम्ही सर्व मुलं मुली एकमेकांशी खूप छान बोलायचो एकत्र खेळायचो. पण  इथे या शाळेत मुलं मुली बोलायची, एकत्र खेळायची बंद झालं. मुलं वेगळी राहू लागली मुली वेगळ्या राहू लागल्या. ८ वीत हिंदी संस्कृत आणि पूर्ण संस्कृत असे असल्यामुळे पुन्हा वर्गात काही नवीन मुलं मुली दुसऱ्या वर्गातून आले आणि आमच्या वर्गातील काही विद्यार्थी दुसऱ्या वर्गात गेले. त्यामुळे माध्यमिक शाळेत फक्त मित्रच लाभले होते. १९९७ ला शालेय शिक्षण संपलं आणि या मित्रांची ही साथ सुटली. 
‎ कॉलेजमध्ये नवीन मित्र लाभले. पुढे नोकरीधंद्याला लागलो तिथे अजून मित्र लाभले. आमचं शिक्षण चालू असताना आणि त्यानंतर नोकरीधंद्यांच्या सुरुवातीच्या काळात मोबाईल, सोशल मिडिया नव्हते. त्यामुळे जुन्या शाळेतील मित्रांशी संपूर्ण संपर्क तुटला. कोण काय करतंय काय चालू आहे काहीच पत्ता नव्हता. माझ्या आसपास राहणारे काही मित्र जसे अमित पिंगळे, जितेश, निखिल, रोहन, वैभव, महेंद्र हे कधीकधी भेटायचे पण बाकी कुणाशी संपर्कच नव्हता.
‎कालांतराने मोबाईल आले आणि पुढे सोशल मिडिया त्यामुळे तिथे परत जुन्या शाळेतील मित्रांसोबत संपर्क झाला. अजून सगळे मित्र भेटले नाही तरी बरेचशे मित्र भेटले. मग व्हाट्सएपवर ग्रुप बनवला. व्हाट्सएपवर का होईना पण प्रत्येकाशी बोलणं होऊ लागलं. बरेच वेळा भेटण्याचे प्लॅन झाले पण भेटणं होत नव्हतं. हेमंत जोशी सारखा सगळ्यांच्या मागे लागायचा भेटूया रे. मग आम्ही काही मुलं एक दोन वेळा भेटलो. नंतर हेमंत सर्वांच्या मागे लागला आपण आपलं Get together करूया. सगळेच त्याला म्हणू लागले अरे कसे भेटणार? सगळ्या मुलींची आता लग्न झाली असतील, नावं बदलली असतील, चेहऱ्यात बदल झाले असतील. ओळखणार कसे? तेव्हा तो म्हणायचा शोधू रे प्रयत्न तर करू. तेव्हा त्याने विश्वास आणि मनिषला सोबत घेऊन शोधाशोध सुरू केली. या तिघांचा प्रीती सुर्वे चव्हाणशी संपर्क झाला. प्रीती बरोबर बोलून या तिघांनी तिला Get together ची कल्पना सांगितली. प्रीतीने मुलींच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर ही कल्पना सांगितली आणि सर्व मुली ही तयार झाल्या. मग काय आम्हा मुलांना ही हो म्हणण्याशिवाय पर्याय उरला नाही. शेवटी सगळ्यांचा होकार आल्यावर तयारी सुरू केली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे ठरत होते. पण मधेच ३१ मार्चला विश्वासने ग्रुपवर मेसेज केला की काही कारणास्तव Reunion पुढे ढकलून पावसाळ्यानंतर होईल. त्यामुळे सगळेच थोडे उदास झाले होते.
‎ २२ तारखेला ग्रुपवर साधारण रात्री ९.३० ला मनिषने काही फोटो आणि व्हिडिओ पाठवले त्यात बातमी होती काश्मिरमधील पहेलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्याची. काही मिनिटांतच विश्वासने मेसेज केला, 'अरे हेमंत जोशी आजच तिथे गेलाय'. आम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच नाहीशी झाल्यासारखी झाली. सगळे आपल्या परीने हेमंत किंवा हेमंतच्या घरच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करायला लागले. पण संपर्क होत नव्हता. ना फोन लागत होता ना मेसेज जात होते. आम्ही सगळे चिंतेत होतो. पण हळूहळू एक एक करून काही बातम्यांमध्ये हेमंतच नाव सारखं यायला लागलं. आपल्या माणसाबद्दल असं काही ऐकलं की मनात कुठेतरी एक वेडी आशा असते की हे सगळं खोटं आहे किंवा काहीतरी चमत्कार होईल आणि आपली व्यक्ती परत येईल. हीच वेडी आशा बाळगून झोपण्याचा प्रयत्न केला. पण रात्रभर डोळ्यासमोर शाळेतील हेमंतचा चेहरा येत होता. कधी कोणाला वाईट न बोलणारा, कधीही न चिडणारा, न रागावणारा, शिक्षक ओरडले अथवा मारलं तरी ह्याच्या चेहऱ्यावर हसू असायचं. 
‎२३ तारखेला शेवटी सकाळी भयानक आणि आम्हाला ऐकायचं नव्हतं ते सत्य ऐकायला आलं. हेमंतचा मृत्यू झालाय हे मानायला मन अजूनही तयार नव्हतं. पण ते एक विदारक सत्य होतं आणि आम्ही ते नाकारू शकत नव्हतो. २३ तारखेला रात्री हेमंतचे अंत्यविधी झाले.हेमंतच्या दहाव्याला मी, मनिष, विश्वास, सागर आणि विजय गेलेलो. सगळे विधी झाल्यावर कावळा शिवण्यासाठी पिंड ठेवले पण बराच वेळ झाला तरी कावळा काही जवळ येईना. हेमंतच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी पिंडासमोर नमस्कार करून त्यांना माहित असलेल्या हेमंतच्या इच्छा पूर्ण करू म्हणून सांगितले पण कावळा काही यायला तयार नव्हता. सागर आणि विजयला काही कामे असल्यामुळे ते नमस्कार करून निघून गेले. बराच वेळ वाट बघून मी, मनिष आणि विश्वास पुन्हा पिंडाला नमस्कार करायला गेलो आणि 'तुझी Reunion ची इच्छा आम्ही आमच्यापरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू' असे म्हणून नमस्कार केला आणि अचानक एक कावळा तिथे येऊन पिंडाजवळ बसला. आम्ही नमस्कार करून तिथेच उभे राहिलो पण कावळा येऊन पण पिंड शिवायला तयार नव्हता. कसा शिवणार कावळा? ध्यानीमनी नसताना फिरायला गेलेला असताना असा अकस्मात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला. वडिलांचं पुढे कसं होईल, बायको मुलांचं पुढे कसं होईल, मुलाच्या भविष्याबाबत बघितलेली स्वप्न, स्वतःसाठी आणि बायकोसाठी बघितलेली स्वप्न सगळंच तर अर्धवट राहिलं होतं. 
‎ काही दिवसांनी विश्वासने प्रीतीबरोबर बोलून मुला मुलींचा एक एकत्र ग्रुप बनवला. Reunion कधी करायचे या वर विचार करू लागलो. १७ नोव्हेंबरला हेमंतचा वाढदिवस असतो. त्याची खूप इच्छा होती Reunion करण्याची. त्यानेच Reunion करायचं आमच्या डोक्यात घातलं होतं. पण आता तो आपल्यात नाही. या वर्षी १७ नोव्हेंबरला सोमवार आहे. त्यामुळे मला आणि विश्वासला असं वाटतं होतं की आपण १५ नोव्हेंबर शनिवार किंवा १६ नोव्हेंबर रविवार या दिवशी शाळेत भेटून हेमंतच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची इच्छा पूर्ण करूया. सर्वांनी आमच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. शेवटी १६ नोव्हेंबर ही तारीख नक्की केली. मग मुलींमधून काही आणि मुलांमधून काही असे स्वेच्छेने कार्यक्रम पार पाडण्यासाठी कामे करू लागले. यात मी, मनिष, विश्वास, शीतल भोसले ढवळे, मनिषा, शलाका, शारदा, योगिता आणि सुप्रिया होतो. 
‎ वर्गातील अजून काही मुलामुलींचा संपर्क मिळतोय का? माहितीतल्या आणि फोन नं असलेल्या मुलांना मुलींना आम्ही नवीन व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये घेतले. पण कोणी राहायला नको म्हणून मी शाळेत जाऊन १९९७ ची आमच्या वर्गातील मुला मुलींची लिस्ट मिळते का बघतो म्हणालो. दुसऱ्या दिवशी मी आणि उमेश शाळेत जायचं ठरवलं. कोण आपल्या वर्गात होतं कोण नव्हतं हे जाणून घेण्यासाठी आणि शाळेत आपण भेटणार आहोत हे कळवण्यासाठी. तसं हेमंत, विश्वास आणि मनिषने शाळेत कळवलं होतं बहुतेक. पण १० वीला आपल्या वर्गात कोण होते नव्हते हे जाणून घ्यायचं होतं. अनवधानाने कोणी राहायला नको हा हेतू. 
‎शाळेत गेलो तेव्हा शिपाई श्री दळवी काकांनी विचारलं काय हवंय? आम्ही त्यांना सांगितलं आम्ही माजी विद्यार्थी आहोत. आम्हाला १९९७ ची विद्यार्थ्यांची यादी हवी आहे. तेव्हा ते आम्हाला आताचे मुख्याध्यापक श्री. नलावडे सरांकडे घेऊन गेले. दुपारची वेळ होती त्यामुळे सर डबा खात होते. म्हणून आम्हाला काही वेळ थांबायला सांगितलं. आम्ही बाहेर थांबलेलो असताना श्री दळवी काकांनी त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन यादी शोधून आम्हाला दाखवली. पण सर द्या म्हणाले की देतो म्हणाले. यादी बघून आम्ही दोघे जुन्या आठवणी ताज्या करायला लागलो. तोपर्यंत सरांनी आम्हाला बोलावलं. सरांना सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. सरांशी बोलून त्यांना धन्यवाद देऊन आम्ही लिस्टचे फोटो काढले. दहावीला आमचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता म्हणून आम्ही वर्ग बघायला दुसऱ्या मजल्यावर गेलो. शाळेत आता बरेच बदल झाले आहेत. आपला जुना वर्ग बघून तेथील आपण बसायचो ते बाक बघून गहिवरून गेल्यासारखं झालं. म्हणून तिथे फोटो काढून आठवणींच्या गप्पा मारत आम्ही दोघं शाळेच्या बाहेर आलो. 
‎ दुसरीकडे Reunion करताना कार्यक्रमाची रूपरेषा आखण्याचे कामही चालू होते पण अजून जून महिना चालू होता. अजून चार ते साडे चार महिने अवकाश होता. पण एकदा श्रावण सुरू झाला सण सुरू झाले की दिवस कसे जातील समजणारही नव्हतं. त्यामुळे आम्ही हळूहळू तयारी चालू ठेवली होती. आम्ही कामे वाटून घेतली होती. कोणी काय करायचं हे ठरलं होतं. तरी एकमेकांना त्यांच्या कामात सहकार्य करत होतो. प्रत्येकजण आपापल्या परीने दैनंदिन जीवनातून वेळ काढून कामे करत होता. दिवस कसे जात होते समजलंच नाही. एव्हाना दिवाळी संपली होती. आम्ही सर्व अजून जोमाने कामाला लागलो. Reunion ला विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही बोलवायचं ठरलं होतं. पण काही शिक्षक हयात नव्हते तर काही शिक्षकांचा संपर्क होऊ शकला नाही. शेवटी आमचे विज्ञानाचे शिक्षक श्री. भुयारकर सर आणि आमच्या गणिताच्या शिक्षिका व वर्गशिक्षिका असलेल्या श्रीमती चौधरी बाई यांच्याशी संपर्क साधला तेव्हा या दोघांनीही येण्यास लगेच होकार दिला. शेवटी सर्व कामे पूर्ण झाली तोपर्यंत आदला दिवस उजाडला. १५ नोव्हेंबरला संध्याकाळी ४.०० वाजता शाळेत भेटायचे आणि सजावटीचे काम, वर्गातील व्यवस्था करायचे आणि येणाऱ्या मान्यवर शिक्षकांसाठी आणलेल्या भेटवस्तू तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तू ठेवायचे ठरले होते. शनिवार असल्यामुळे पुण्यात स्थायिक झालेले आमचे मित्रा मैत्रीणी ही आले होते. त्यांनाही मदत करायला यायचे होते. पण येणाऱ्या सर्वांना काही भेटवस्तू आणलेल्या त्या त्यांना कळू नये, त्यात ते एवढा प्रवास करून इथे आलेले थकले असतील म्हणून आम्ही त्यांना मदतीला येण्यास नकार दिला. आदल्या दिवशीची सगळी कामे आटपून कार्यक्रमाच्या दिवसाची ओढ सुरू झाली.
 १६ तारखेला सकाळी ७.१५ ते ७.३० च्या आसपास आम्ही राहिलेल्या सजावटीच्या कामांना सुरुवात केली. योगीताने रांगोळी आणि सरस्वती मूर्तीजवळील आरास छानच केली होती.साधारण ९.३० पर्यंत सर्व कामे पूर्ण झाली तोपर्यंत एक एक करत सर्वांची येण्याची सुरुवात झाली. सकाळी सर्वांसाठी चहा आणि नाश्ता मागवला होता. जसे एक एक जण येत होते तसं शलाका, मनिषा, शीतल, शारदा आणि सुप्रिया यांनी त्यांचं स्वागत करून नाश्ता करायला सांगितलं. थोड्याच वेळात मनिष आणि शीतल श्री भुयारकर सर यांना घेऊन यायला खालती उतरले तर समोरून सर स्वतः येत होते. कामाच्या व्यापात यांना निघायला थोडा उशिर झाल्यामुळे सर स्वतः शाळेत आले. सरांना मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसवून सरांना नाश्ता देऊन मी आणि सलिल फोटो काढत होतो. निखिल, प्रशांत, शारदा, शितल सावंत सुर्वे सरांची विचारपूस करत गप्पा मारत होतो. तेव्हा विश्वास आला आणि आम्हाला पटकन खालती ये म्हणाला. मी आणि सलिल पण धावत खालती गेलो. आम्हाला वाटले मनिष श्रीमती चौधरी बाईंना घेऊन आलाय. पण शाळेच्या गेटवर जाऊन बघतो तर अमेरिकेत स्थायिक झालेली आणि कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं म्हणालेली माधुरी गेटजवळ उभी होती. शाळा आणि जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. अर्थात एवढ्या वर्षांनी शाळा बघून आणि जुन्या मित्रमैत्रीणींना भेटून ती भावुक झाली होती. ती रडत नसून ते आनंदाश्रू होते. आम्हा सर्वांना भेटून आमच्या बरोबर फोटो काढले. तेवढ्यात मनिष आणि शीतल श्रीमती चौधरी बाईंना घेऊन आले. त्यांना शाळेत वर घेऊन गेलो. दोन्ही शिक्षकांचं स्वागत ठरल्याप्रमाणे करून आम्ही त्यांना वर्गात घेऊन गेलो. बाकी सर्वांना बाहेर उभे करून विश्वासने शाळेची घंटा वाजवली आणि कल्ला करत एक एक करून आम्ही सर्व विद्यार्थी आमच्या १० वी ब च्या वर्गात पुन्हा २८ वर्षांनी गेलो. सगळे वर्गात आल्यावर श्रीमती चौधरी बाईंना आणायला उशिर झाल्यामुळे त्यांच्यासाठी ठेवलेला नाश्ता त्यांना दिला. त्यांचा नाश्ता झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमाला आम्ही शाळेचे आताचे मुख्याध्यापक श्री नलावडे सर यांना ही यायची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव त्यांना यायला जमणार नव्हते. आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना शाळेच्या संचालक मंडळाचे सदस्य श्री जाधव सर शाळेत आले होते. त्यामुळे शाळेतर्फे आम्ही त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच शाळेने आम्हाला मदत करायला दोन शिपाई दिले होते श्री दळवी काका आणि श्री छल्लारे दादा त्यांना ही आम्ही उपस्थित राहण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल भोसले ढवळे आणि शारदा यांनी उत्तम रित्या केले. सर्वात प्रथम राष्ट्रगीत गाऊन आम्ही आमचा आजचा वर्ग सुरू केला. त्यानंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन दोन्ही शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांचा परिचय अर्थात त्यांचा जीवन प्रवास शीतलने सांगितला. त्यानंतर प्रथम हेमंतला श्रद्धांजली वाहिली. तसेच अमित पिंगळे, वैभव वाकडे आणि वर्णिता खंडागळे या आमच्या अजून काही दिवंगत मित्र आणि मैत्रिणीला श्रद्धांजली वाहून मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रथम श्री भुयारकर सरांचा सत्कार दत्तात्रय जोशी आणि प्रशांत पंगेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्रीमती चौधरी बाई यांचा सत्कार शितल सावंत सुर्वे, माधुरी झोपे मोराजकर आणि प्रीती सुर्वे चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. श्री भुयारकर सरांच्या हस्ते शाळेचे संचालक मंडळाचे सदस्य श्री जाधव आणि शिपाई काका श्री दळवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती चौधरी बाईंच्या हस्ते शिपाई दादा श्री छल्लारे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्रीमती चौधरी बाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि दोस्ती या सिनेमातील एक गाणे आमच्या सर्वांच्या नव्याने सुरू झालेल्या मैत्रीसाठी गायले. पुढे भुयारकर सरांनी आपले मनोगत व्यक्त करत आमच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर श्री जाधव सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार आणि मनोगत झाल्यावर दोन्ही शिक्षकांनी आम्हा विद्यार्थ्यांबरोबर बराच वेळ संवाद साधला. काही मित्रांनी मैत्रिणींनी आपला परिचय आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. भावना व्यक्त करता करता काही जण भावुक होतं होते. एव्हाना १ वाजला होता. दोन्ही शिक्षकांना लवकर जायचे असल्यामुळे शीतलने मधली सुट्टी झाल्याची घोषणा केली. शाळेत असताना आम्ही शाळेत डबे घेऊन यायचो आणि एकमेकांचे डबे वाटून खात होतो. पण आज मात्र आम्ही आता जसे बऱ्याचशा शाळेत मुलांना जेवण दिले जाते तसं शाळेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये जेवणाची सोय केली होती. जेवण झाल्यावर आम्ही तिथेच काही वेळ शिक्षकांबरोबर, मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारल्या. काही वेळाने मनिष आणि शीतल दोन्ही शिक्षकांना घरी सोडून आले. तोपर्यंत आम्ही सर्व मित्र मैत्रिणी पुन्हा वर्गात बसून गप्पा कुटु लागलो. मनिष आणि शीतल आल्यावर पुन्हा काही मित्र मैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर housie game खेळलो. जिंकणाऱ्यांना बक्षिसे दिली मग मनिषने सुंदर अशी 'मेरे दिल का कमरा कर लो occupy' हे गाणं मनिषने त्याच्या आयुष्यातील तन्वीसाठी गायले होते आणि 'लाल टांगा घेऊनी आला लाला टांगे वाला' ही दोन गाणी गायली त्यानंतर योगीताने 'दिल हे छोटासा, छोटीसी आशा' हे फार सुंदर गाणे गायले. या दोघांची गाणी ऐकून कदाचित विश्वासला ही गाण्याची इच्छा होऊ लागली आणि त्याने सर्वांच्या साथीने सागर सिनेमातील 'सच मेरे यार है' हे गाणे गायले. हे सर्व होईपर्यत ५.०० - ५.३० झाले होते आणि आता वेळ झाली होती आमच्या आयुष्यातील एका उनाड दिवसाची सांगता करायची. हळूहळू एकेकाला घेतलेली भेटवस्तू देऊन निरोप देण्यास सुरुवात झाली पण पुन्हा भेटायचं आणि असंच भेटत राहायचं जेव्हा जमेल तेव्हा हे ठरवून. सर्वांना निरोप देत आम्ही आवरा आवर करायला सुरुवात केली वर्गात कार्यक्रम करण्यासाठी आम्ही वर्गातील काही बेंच बाहेर काढून ठेवले होते ते पुन्हा वर्गात आणायला मी गेलो तेव्हा दळवी काका आणि छल्लारे दादांनी मला तुम्ही तुमच्या सामानाची आवरा आवर करा. बाकी शाळेतील सर्व आम्ही आवरतो म्हणाले. सगळ आवरून आम्ही ६.१५ - ६.३० ला शाळेच्या गेट जवळ आलो. इथे आता आम्ही ७-८ जण आणि पुण्याला जायला निघालेले निखिल, सलिल, प्राची आणि स्मिता एवढेच उरलो होतो. जवळपास सर्वच भावुक झाले होते. अखेर पुणेकरांना निरोप देऊन आम्ही शाळेकडे बघत आजच्या दिवसाच्या आठवणी हृदयात साठवून आपापल्या घरी निघून आलो. 

राजगड तोरणा लिंगाणा रायगड

 गणपतीनंतर नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. मागच्या वर्षी आम्ही किल्ले साल्हेर आणि सालोटा केले होते त्यामुळे यावर्षी किल्ले मुल...