Thursday, 20 November 2025

स्नेह मेळावा १०वी/ब १९९७ स. वा. जोशी विद्यालय

 राहायला डोंबिवलीमधील सारस्वत कॉलनीत त्यामुळे प्राथमिक शिक्षण शिशुकुंज शाळेत आणि पुढे माध्यमिक शिक्षण स. वा. जोशी विद्यालय येथे झाले. प्राथमिक शाळेत शिक्षण घेताना बरेच मित्र लाभले. प्राथमिक शाळेतील बरेचशे मित्र माध्यमिक शाळेत दुसऱ्या वेगवेगळ्या वर्गात गेले पण काही माझ्या वर्गात होते. शिशुकुंज शाळेत आम्ही सर्व मुलं मुली एकमेकांशी खूप छान बोलायचो एकत्र खेळायचो. पण  इथे या शाळेत मुलं मुली बोलायची, एकत्र खेळायची बंद झालं. मुलं वेगळी राहू लागली मुली वेगळ्या राहू लागल्या. ८ वीत हिंदी संस्कृत आणि पूर्ण संस्कृत असे असल्यामुळे पुन्हा वर्गात काही नवीन मुलं मुली दुसऱ्या वर्गातून आले आणि आमच्या वर्गातील काही विद्यार्थी दुसऱ्या वर्गात गेले. त्यामुळे माध्यमिक शाळेत फक्त मित्रच लाभले होते. १९९७ ला शालेय शिक्षण संपलं आणि या मित्रांची ही साथ सुटली. 
‎ कॉलेजमध्ये नवीन मित्र लाभले. पुढे नोकरीधंद्याला लागलो तिथे अजून मित्र लाभले. आमचं शिक्षण चालू असताना आणि त्यानंतर नोकरीधंद्यांच्या सुरुवातीच्या काळात मोबाईल, सोशल मिडिया नव्हते. त्यामुळे जुन्या शाळेतील मित्रांशी संपूर्ण संपर्क तुटला. कोण काय करतंय काय चालू आहे काहीच पत्ता नव्हता. माझ्या आसपास राहणारे काही मित्र जसे अमित पिंगळे, जितेश, निखिल, रोहन, वैभव, महेंद्र हे कधीकधी भेटायचे पण बाकी कुणाशी संपर्कच नव्हता.
‎कालांतराने मोबाईल आले आणि पुढे सोशल मिडिया त्यामुळे तिथे परत जुन्या शाळेतील मित्रांसोबत संपर्क झाला. अजून सगळे मित्र भेटले नाही तरी बरेचशे मित्र भेटले. मग व्हाट्सएपवर ग्रुप बनवला. व्हाट्सएपवर का होईना पण प्रत्येकाशी बोलणं होऊ लागलं. बरेच वेळा भेटण्याचे प्लॅन झाले पण भेटणं होत नव्हतं. हेमंत जोशी सारखा सगळ्यांच्या मागे लागायचा भेटूया रे. मग आम्ही काही मुलं एक दोन वेळा भेटलो. नंतर हेमंत सर्वांच्या मागे लागला आपण आपलं Get together करूया. सगळेच त्याला म्हणू लागले अरे कसे भेटणार? सगळ्या मुलींची आता लग्न झाली असतील, नावं बदलली असतील, चेहऱ्यात बदल झाले असतील. ओळखणार कसे? तेव्हा तो म्हणायचा शोधू रे प्रयत्न तर करू. तेव्हा त्याने विश्वास आणि मनिषला सोबत घेऊन शोधाशोध सुरू केली. या तिघांचा प्रीती सुर्वे चव्हाणशी संपर्क झाला. प्रीती बरोबर बोलून या तिघांनी तिला Get together ची कल्पना सांगितली. प्रीतीने मुलींच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर ही कल्पना सांगितली आणि सर्व मुली ही तयार झाल्या. मग काय आम्हा मुलांना ही हो म्हणण्याशिवाय पर्याय उरला नाही. शेवटी सगळ्यांचा होकार आल्यावर तयारी सुरू केली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे ठरत होते. पण मधेच ३१ मार्चला विश्वासने ग्रुपवर मेसेज केला की काही कारणास्तव Reunion पुढे ढकलून पावसाळ्यानंतर होईल. त्यामुळे सगळेच थोडे उदास झाले होते.
‎ २२ तारखेला ग्रुपवर साधारण रात्री ९.३० ला मनिषने काही फोटो आणि व्हिडिओ पाठवले त्यात बातमी होती काश्मिरमधील पहेलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्याची. काही मिनिटांतच विश्वासने मेसेज केला, 'अरे हेमंत जोशी आजच तिथे गेलाय'. आम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच नाहीशी झाल्यासारखी झाली. सगळे आपल्या परीने हेमंत किंवा हेमंतच्या घरच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करायला लागले. पण संपर्क होत नव्हता. ना फोन लागत होता ना मेसेज जात होते. आम्ही सगळे चिंतेत होतो. पण हळूहळू एक एक करून काही बातम्यांमध्ये हेमंतच नाव सारखं यायला लागलं. आपल्या माणसाबद्दल असं काही ऐकलं की मनात कुठेतरी एक वेडी आशा असते की हे सगळं खोटं आहे किंवा काहीतरी चमत्कार होईल आणि आपली व्यक्ती परत येईल. हीच वेडी आशा बाळगून झोपण्याचा प्रयत्न केला. पण रात्रभर डोळ्यासमोर शाळेतील हेमंतचा चेहरा येत होता. कधी कोणाला वाईट न बोलणारा, कधीही न चिडणारा, न रागावणारा, शिक्षक ओरडले अथवा मारलं तरी ह्याच्या चेहऱ्यावर हसू असायचं. 
‎२३ तारखेला शेवटी सकाळी भयानक आणि आम्हाला ऐकायचं नव्हतं ते सत्य ऐकायला आलं. हेमंतचा मृत्यू झालाय हे मानायला मन अजूनही तयार नव्हतं. पण ते एक विदारक सत्य होतं आणि आम्ही ते नाकारू शकत नव्हतो. २३ तारखेला रात्री हेमंतचे अंत्यविधी झाले.हेमंतच्या दहाव्याला मी, मनिष, विश्वास, सागर आणि विजय गेलेलो. सगळे विधी झाल्यावर कावळा शिवण्यासाठी पिंड ठेवले पण बराच वेळ झाला तरी कावळा काही जवळ येईना. हेमंतच्या घरच्यांनी, नातेवाईकांनी पिंडासमोर नमस्कार करून त्यांना माहित असलेल्या हेमंतच्या इच्छा पूर्ण करू म्हणून सांगितले पण कावळा काही यायला तयार नव्हता. सागर आणि विजयला काही कामे असल्यामुळे ते नमस्कार करून निघून गेले. बराच वेळ वाट बघून मी, मनिष आणि विश्वास पुन्हा पिंडाला नमस्कार करायला गेलो आणि 'तुझी Reunion ची इच्छा आम्ही आमच्यापरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू' असे म्हणून नमस्कार केला आणि अचानक एक कावळा तिथे येऊन पिंडाजवळ बसला. आम्ही नमस्कार करून तिथेच उभे राहिलो पण कावळा येऊन पण पिंड शिवायला तयार नव्हता. कसा शिवणार कावळा? ध्यानीमनी नसताना फिरायला गेलेला असताना असा अकस्मात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला. वडिलांचं पुढे कसं होईल, बायको मुलांचं पुढे कसं होईल, मुलाच्या भविष्याबाबत बघितलेली स्वप्न, स्वतःसाठी आणि बायकोसाठी बघितलेली स्वप्न सगळंच तर अर्धवट राहिलं होतं. 
‎ काही दिवसांनी विश्वासने प्रीतीबरोबर बोलून मुला मुलींचा एक एकत्र ग्रुप बनवला. Reunion कधी करायचे या वर विचार करू लागलो. १७ नोव्हेंबरला हेमंतचा वाढदिवस असतो. त्याची खूप इच्छा होती Reunion करण्याची. त्यानेच Reunion करायचं आमच्या डोक्यात घातलं होतं. पण आता तो आपल्यात नाही. या वर्षी १७ नोव्हेंबरला सोमवार आहे. त्यामुळे मला आणि विश्वासला असं वाटतं होतं की आपण १५ नोव्हेंबर शनिवार किंवा १६ नोव्हेंबर रविवार या दिवशी शाळेत भेटून हेमंतच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची इच्छा पूर्ण करूया. सर्वांनी आमच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. शेवटी १६ नोव्हेंबर ही तारीख नक्की केली. मग मुलींमधून काही आणि मुलांमधून काही असे स्वेच्छेने कार्यक्रम पार पाडण्यासाठी कामे करू लागले. यात मी, मनिष, विश्वास, शीतल भोसले ढवळे, मनिषा, शलाका, शारदा, योगिता आणि सुप्रिया होतो. 
‎ वर्गातील अजून काही मुलामुलींचा संपर्क मिळतोय का? माहितीतल्या आणि फोन नं असलेल्या मुलांना मुलींना आम्ही नवीन व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये घेतले. पण कोणी राहायला नको म्हणून मी शाळेत जाऊन १९९७ ची आमच्या वर्गातील मुला मुलींची लिस्ट मिळते का बघतो म्हणालो. दुसऱ्या दिवशी मी आणि उमेश शाळेत जायचं ठरवलं. कोण आपल्या वर्गात होतं कोण नव्हतं हे जाणून घेण्यासाठी आणि शाळेत आपण भेटणार आहोत हे कळवण्यासाठी. तसं हेमंत, विश्वास आणि मनिषने शाळेत कळवलं होतं बहुतेक. पण १० वीला आपल्या वर्गात कोण होते नव्हते हे जाणून घ्यायचं होतं. अनवधानाने कोणी राहायला नको हा हेतू. 
‎शाळेत गेलो तेव्हा शिपाई श्री दळवी काकांनी विचारलं काय हवंय? आम्ही त्यांना सांगितलं आम्ही माजी विद्यार्थी आहोत. आम्हाला १९९७ ची विद्यार्थ्यांची यादी हवी आहे. तेव्हा ते आम्हाला आताचे मुख्याध्यापक श्री. नलावडे सरांकडे घेऊन गेले. दुपारची वेळ होती त्यामुळे सर डबा खात होते. म्हणून आम्हाला काही वेळ थांबायला सांगितलं. आम्ही बाहेर थांबलेलो असताना श्री दळवी काकांनी त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन यादी शोधून आम्हाला दाखवली. पण सर द्या म्हणाले की देतो म्हणाले. यादी बघून आम्ही दोघे जुन्या आठवणी ताज्या करायला लागलो. तोपर्यंत सरांनी आम्हाला बोलावलं. सरांना सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. सरांशी बोलून त्यांना धन्यवाद देऊन आम्ही लिस्टचे फोटो काढले. दहावीला आमचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता म्हणून आम्ही वर्ग बघायला दुसऱ्या मजल्यावर गेलो. शाळेत आता बरेच बदल झाले आहेत. आपला जुना वर्ग बघून तेथील आपण बसायचो ते बाक बघून गहिवरून गेल्यासारखं झालं. म्हणून तिथे फोटो काढून आठवणींच्या गप्पा मारत आम्ही दोघं शाळेच्या बाहेर आलो. 
‎ दुसरीकडे Reunion करताना कार्यक्रमाची रूपरेषा आखण्याचे कामही चालू होते पण अजून जून महिना चालू होता. अजून चार ते साडे चार महिने अवकाश होता. पण एकदा श्रावण सुरू झाला सण सुरू झाले की दिवस कसे जातील समजणारही नव्हतं. त्यामुळे आम्ही हळूहळू तयारी चालू ठेवली होती. आम्ही कामे वाटून घेतली होती. कोणी काय करायचं हे ठरलं होतं. तरी एकमेकांना त्यांच्या कामात सहकार्य करत होतो. प्रत्येकजण आपापल्या परीने दैनंदिन जीवनातून वेळ काढून कामे करत होता. दिवस कसे जात होते समजलंच नाही. एव्हाना दिवाळी संपली होती. आम्ही सर्व अजून जोमाने कामाला लागलो. Reunion ला विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही बोलवायचं ठरलं होतं. पण काही शिक्षक हयात नव्हते तर काही शिक्षकांचा संपर्क होऊ शकला नाही. शेवटी आमचे विज्ञानाचे शिक्षक श्री. भुयारकर सर आणि आमच्या गणिताच्या शिक्षिका व वर्गशिक्षिका असलेल्या श्रीमती चौधरी बाई यांच्याशी संपर्क साधला तेव्हा या दोघांनीही येण्यास लगेच होकार दिला. शेवटी सर्व कामे पूर्ण झाली तोपर्यंत आदला दिवस उजाडला. १५ नोव्हेंबरला संध्याकाळी ४.०० वाजता शाळेत भेटायचे आणि सजावटीचे काम, वर्गातील व्यवस्था करायचे आणि येणाऱ्या मान्यवर शिक्षकांसाठी आणलेल्या भेटवस्तू तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तू ठेवायचे ठरले होते. शनिवार असल्यामुळे पुण्यात स्थायिक झालेले आमचे मित्रा मैत्रीणी ही आले होते. त्यांनाही मदत करायला यायचे होते. पण येणाऱ्या सर्वांना काही भेटवस्तू आणलेल्या त्या त्यांना कळू नये, त्यात ते एवढा प्रवास करून इथे आलेले थकले असतील म्हणून आम्ही त्यांना मदतीला येण्यास नकार दिला. आदल्या दिवशीची सगळी कामे आटपून कार्यक्रमाच्या दिवसाची ओढ सुरू झाली.
 १६ तारखेला सकाळी ७.१५ ते ७.३० च्या आसपास आम्ही राहिलेल्या सजावटीच्या कामांना सुरुवात केली. योगीताने रांगोळी आणि सरस्वती मूर्तीजवळील आरास छानच केली होती.साधारण ९.३० पर्यंत सर्व कामे पूर्ण झाली तोपर्यंत एक एक करत सर्वांची येण्याची सुरुवात झाली. सकाळी सर्वांसाठी चहा आणि नाश्ता मागवला होता. जसे एक एक जण येत होते तसं शलाका, मनिषा, शीतल, शारदा आणि सुप्रिया यांनी त्यांचं स्वागत करून नाश्ता करायला सांगितलं. थोड्याच वेळात मनिष आणि शीतल श्री भुयारकर सर यांना घेऊन यायला खालती उतरले तर समोरून सर स्वतः येत होते. कामाच्या व्यापात यांना निघायला थोडा उशिर झाल्यामुळे सर स्वतः शाळेत आले. सरांना मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसवून सरांना नाश्ता देऊन मी आणि सलिल फोटो काढत होतो. निखिल, प्रशांत, शारदा, शितल सावंत सुर्वे सरांची विचारपूस करत गप्पा मारत होतो. तेव्हा विश्वास आला आणि आम्हाला पटकन खालती ये म्हणाला. मी आणि सलिल पण धावत खालती गेलो. आम्हाला वाटले मनिष श्रीमती चौधरी बाईंना घेऊन आलाय. पण शाळेच्या गेटवर जाऊन बघतो तर अमेरिकेत स्थायिक झालेली आणि कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं म्हणालेली माधुरी गेटजवळ उभी होती. शाळा आणि जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. अर्थात एवढ्या वर्षांनी शाळा बघून आणि जुन्या मित्रमैत्रीणींना भेटून ती भावुक झाली होती. ती रडत नसून ते आनंदाश्रू होते. आम्हा सर्वांना भेटून आमच्या बरोबर फोटो काढले. तेवढ्यात मनिष आणि शीतल श्रीमती चौधरी बाईंना घेऊन आले. त्यांना शाळेत वर घेऊन गेलो. दोन्ही शिक्षकांचं स्वागत ठरल्याप्रमाणे करून आम्ही त्यांना वर्गात घेऊन गेलो. बाकी सर्वांना बाहेर उभे करून विश्वासने शाळेची घंटा वाजवली आणि कल्ला करत एक एक करून आम्ही सर्व विद्यार्थी आमच्या १० वी ब च्या वर्गात पुन्हा २८ वर्षांनी गेलो. सगळे वर्गात आल्यावर श्रीमती चौधरी बाईंना आणायला उशिर झाल्यामुळे त्यांच्यासाठी ठेवलेला नाश्ता त्यांना दिला. त्यांचा नाश्ता झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमाला आम्ही शाळेचे आताचे मुख्याध्यापक श्री नलावडे सर यांना ही यायची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव त्यांना यायला जमणार नव्हते. आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना शाळेच्या संचालक मंडळाचे सदस्य श्री जाधव सर शाळेत आले होते. त्यामुळे शाळेतर्फे आम्ही त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच शाळेने आम्हाला मदत करायला दोन शिपाई दिले होते श्री दळवी काका आणि श्री छल्लारे दादा त्यांना ही आम्ही उपस्थित राहण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल भोसले ढवळे आणि शारदा यांनी उत्तम रित्या केले. सर्वात प्रथम राष्ट्रगीत गाऊन आम्ही आमचा आजचा वर्ग सुरू केला. त्यानंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन दोन्ही शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांचा परिचय अर्थात त्यांचा जीवन प्रवास शीतलने सांगितला. त्यानंतर प्रथम हेमंतला श्रद्धांजली वाहिली. तसेच अमित पिंगळे, वैभव वाकडे आणि वर्णिता खंडागळे या आमच्या अजून काही दिवंगत मित्र आणि मैत्रिणीला श्रद्धांजली वाहून मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रथम श्री भुयारकर सरांचा सत्कार दत्तात्रय जोशी आणि प्रशांत पंगेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्रीमती चौधरी बाई यांचा सत्कार शितल सावंत सुर्वे, माधुरी झोपे मोराजकर आणि प्रीती सुर्वे चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. श्री भुयारकर सरांच्या हस्ते शाळेचे संचालक मंडळाचे सदस्य श्री जाधव आणि शिपाई काका श्री दळवी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती चौधरी बाईंच्या हस्ते शिपाई दादा श्री छल्लारे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्रीमती चौधरी बाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि दोस्ती या सिनेमातील एक गाणे आमच्या सर्वांच्या नव्याने सुरू झालेल्या मैत्रीसाठी गायले. पुढे भुयारकर सरांनी आपले मनोगत व्यक्त करत आमच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर श्री जाधव सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार आणि मनोगत झाल्यावर दोन्ही शिक्षकांनी आम्हा विद्यार्थ्यांबरोबर बराच वेळ संवाद साधला. काही मित्रांनी मैत्रिणींनी आपला परिचय आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. भावना व्यक्त करता करता काही जण भावुक होतं होते. एव्हाना १ वाजला होता. दोन्ही शिक्षकांना लवकर जायचे असल्यामुळे शीतलने मधली सुट्टी झाल्याची घोषणा केली. शाळेत असताना आम्ही शाळेत डबे घेऊन यायचो आणि एकमेकांचे डबे वाटून खात होतो. पण आज मात्र आम्ही आता जसे बऱ्याचशा शाळेत मुलांना जेवण दिले जाते तसं शाळेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये जेवणाची सोय केली होती. जेवण झाल्यावर आम्ही तिथेच काही वेळ शिक्षकांबरोबर, मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा मारल्या. काही वेळाने मनिष आणि शीतल दोन्ही शिक्षकांना घरी सोडून आले. तोपर्यंत आम्ही सर्व मित्र मैत्रिणी पुन्हा वर्गात बसून गप्पा कुटु लागलो. मनिष आणि शीतल आल्यावर पुन्हा काही मित्र मैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर housie game खेळलो. जिंकणाऱ्यांना बक्षिसे दिली मग मनिषने सुंदर अशी 'मेरे दिल का कमरा कर लो occupy' हे गाणं मनिषने त्याच्या आयुष्यातील तन्वीसाठी गायले होते आणि 'लाल टांगा घेऊनी आला लाला टांगे वाला' ही दोन गाणी गायली त्यानंतर योगीताने 'दिल हे छोटासा, छोटीसी आशा' हे फार सुंदर गाणे गायले. या दोघांची गाणी ऐकून कदाचित विश्वासला ही गाण्याची इच्छा होऊ लागली आणि त्याने सर्वांच्या साथीने सागर सिनेमातील 'सच मेरे यार है' हे गाणे गायले. हे सर्व होईपर्यत ५.०० - ५.३० झाले होते आणि आता वेळ झाली होती आमच्या आयुष्यातील एका उनाड दिवसाची सांगता करायची. हळूहळू एकेकाला घेतलेली भेटवस्तू देऊन निरोप देण्यास सुरुवात झाली पण पुन्हा भेटायचं आणि असंच भेटत राहायचं जेव्हा जमेल तेव्हा हे ठरवून. सर्वांना निरोप देत आम्ही आवरा आवर करायला सुरुवात केली वर्गात कार्यक्रम करण्यासाठी आम्ही वर्गातील काही बेंच बाहेर काढून ठेवले होते ते पुन्हा वर्गात आणायला मी गेलो तेव्हा दळवी काका आणि छल्लारे दादांनी मला तुम्ही तुमच्या सामानाची आवरा आवर करा. बाकी शाळेतील सर्व आम्ही आवरतो म्हणाले. सगळ आवरून आम्ही ६.१५ - ६.३० ला शाळेच्या गेट जवळ आलो. इथे आता आम्ही ७-८ जण आणि पुण्याला जायला निघालेले निखिल, सलिल, प्राची आणि स्मिता एवढेच उरलो होतो. जवळपास सर्वच भावुक झाले होते. अखेर पुणेकरांना निरोप देऊन आम्ही शाळेकडे बघत आजच्या दिवसाच्या आठवणी हृदयात साठवून आपापल्या घरी निघून आलो. 

राजगड तोरणा लिंगाणा रायगड

 गणपतीनंतर नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. मागच्या वर्षी आम्ही किल्ले साल्हेर आणि सालोटा केले होते त्यामुळे यावर्षी किल्ले मुल...