गणपतीपासून ट्रेकला कुठे जायचे याचं प्लॅंनिंग सुरू झालं. बराच विचार करून शेवटी साल्हेर सालोटा ट्रेक करण्याचे ठरवले. साल्हेर सालोटा ट्रेक ठरवण्यामागे माझे ३-४ उद्देश होते. एक तर मी नाशिक किंवा त्या भागातील फार कमी किल्ले बघितले होते. दुसरं म्हणजे साल्हेर या किल्ल्याला एका मोठ्या लढाईची पार्श्वभूमी आहे. तिसरं म्हणजे किल्ल्यांमध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात ऊंच किल्ला आहे (५४४१ फूट) आणि चौथं म्हणजे सात चिरंजीवींपैकी एक असलेल्या श्री परशुरामांची तपोभूमी म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे. दिवाळीत भेटून तारीख ठरवली. २७ डिसेंबर रात्री निघून २९ डिसेंबर रात्रीपर्यंत परत येण्याचे ठरले. त्यात काही जण साल्हेर सालोटा बरोबर मुल्हेर मोरा आणि हरगड करण्याचे पण बोलत होते. दोन दिवसात ५ किल्ले करता येतात. पण किल्ले व्यवस्थित बघता येत नाहीत. त्यामुळे साल्हेर आणि सालोटा करण्याचे ठरले. ग्रुपवर मेसेज करून कोण कोण येणार आहेत ते विचारले. साधारण १०-१२ जण होत होते. 

Celosia argentea (कुरडू)
अखेर डिसेंबर उजाडल्यावर जाण्यासाठी गाडी टमटम शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्या. बरेच शोधून गाडी मिळत नव्हती. अक्षयच्या ऑफिसमधील त्याचे सर आकाश यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसाऱ्याचा एक टॅक्सी वाला मिळाला. त्याने आम्हाला भाडे सांगितले ते १० जणांसाठी योग्य होते पण आम्ही आता १३ जण असल्याने अजून ६-७ जण तरी पाहिजे होते. त्यामुळे अजून कोणी येतंय का बघायला सुरुवात केली. काही केल्या १४-१५ च्या वर आकडा जात नव्हता. अभि जोशीच्या ओळखीने एका ट्रॅव्हलवाल्याने १७ जणांचे साधारण २ टॅक्सीचे कसारा ते वाघंबा गावात सोडून परत कसाऱ्याला सोडायचे जेवढे पैसे सांगितले तेवढ्याच पैशात डोंबिवली ते वाघंबा गावात सोडून परत डोंबिवलीला आणण्याचे पैसे सांगितले त्यामुळे प्रवास सुखकर होणार होता. आणि परत ट्रेन पकडून कसाऱ्याला जा आणि परत येताना कसाऱ्याला ट्रेनची वाट बघा ही झंझट राहणार नव्हती. त्यामुळे ट्रॅव्हलवाल्याला सांगून १७ सीट ट्रॅव्हलर बुक केली. पण अजून १४ जणंच होत होते. तेव्हा विघ्नेशने अजून एका मित्राला विचारू का असे विचारले. त्याचा मित्र राहुल नायर हाही तयार झाला. शेवटी कसे बसे १५ जण झाले. सगळी तयारी झाली. गाडीचे भाडे भरून लागणारे साहित्य जमा करून झाले होते. पण जायच्या दिवशी संध्याकाळी आदित्यची विकेट पडली. काही कारणास्तव आदित्य कॅन्सल झाला आणि परत आकडा १४ वर येऊन स्थिरावला. शेवटी मी, गौरव सावंत (माझा मावस भाऊ), अभि जोशी, ऋषी जोशी, प्रणव पाटील, शुभम खुजे, अभि बिरंबोळे, सचिन कुऱ्हाडे, विघ्नेश कृष्णन, राहुल नायर, अक्षय भोसले, आकाश बोरकर, जगन पवार, सुमित फडके असे १४ जण फायनल झालो.
ठरल्याप्रमाणे रात्री ११.०० ला ट्रॅव्हलर आमच्या सहनिवसात आली. बसवर व्यवस्थित बॅगा टाकून बांधून ११.४५ ला सहनिवासातून निघालो. पडघ्यापर्यंत सुखाने प्रवास सुरु होता आणि अचानक हलका पाऊस सुरू झाला. हलका पाऊस असल्याने आम्ही पुढे प्रवास चालू ठेवण्याचे ठरवले. कसारा घाटाच्या आधी ढाब्यावर चहा नाश्त्याला थांबू तेव्हा बॅगा आत घेऊ असे ठरले. योगायोग म्हणावा की निसर्गाचे काही संकेत जसा पाऊस सुरू झाला काही मिनिटांतच ड्रायव्हरने गाडीतील पेन ड्राईव्हवर लावलेल्या गाण्यात, अचानक पावसाळी गाणी चालू झाली. सुरुवात, 'ए आई, मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंबचिंब होऊ दे' या बालपणीच्या गीताने झाली, त्यानंतर तर मिलिंद इंगळेंच्या गारवा या अल्बमची गाणी गारवा वाऱ्यावर भिरभिर पारवा, गार वारा हा भरारा नभ टिपूस टिपूस... त्यानंतर कसाऱ्याला पोहोचण्याआधीच जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे मोकळी जागा बघून गाडी बाजूला घेतली. मी आणि अभि जोशी गाडीच्या टपावर गेलो आणि पटापट बॅगा काढून खाली पास केल्या. पण तोपर्यंत आम्ही पूर्ण भिजून गेलो. परत पुढचा प्रवास सुरु केला. कसारा घाटाच्या आधी ढाब्यावर थांबून चहा नाश्ता केला. तिथून साधारण ४ तास अंतर दाखवत होतं. नाश्ता करून आम्ही निघालो. साधारण ८ वाजता वाघंबा गावात पोहोचलो. तिथे चहा नाश्ता करून ९.१५ ला साधारण आम्ही किल्ल्यावर जाण्यास सुरुवात केली. १२.०० च्या आसपास आम्ही साल्हेर आणि सालोटा या किल्ल्यांमधील खिंडीत पोहोचलो. आम्ही ठरवले होते त्यापेक्षा खूप उशीर झाला होता. त्यामुळे मी आणि ऋषीने खिंडीत थांबण्याचा निर्णय घेतला. बाकी सगळ्यांच्या बॅगा आमच्या जवळ ठेऊन वर जाऊन सालोटा किल्ला बघण्याचे ठरले. जेणेकरून बाकीच्यांचा सालोटा किल्ला लवकर बघून होईल आणि आधी झालेला उशिर आम्ही भरून काढू आणि झाले ही तसेच. सगळी मुलं सालोटा किल्ला बघून २.०० पर्यंत परत खिंडीत आले. सगळे आल्यावर आम्ही घेऊन आलेले थेपले खाऊन घेतले. ३.०० वाजण्याच्या सुमारास आम्ही खिंडीतून साल्हेर किल्ल्यावर जाण्यास सुरुवात केली. तासाभरात आम्ही साल्हेर किल्ल्याच्या गुहांजवळ पोहोचलो. पण गुहा राहण्या लायक नव्हत्या. सर्वत्र घाण आणि कचरा होता. गुहांच्या बाहेर टेंट लावून राहण्याची सोय नव्हती. त्यामुळे आम्ही पुढे जाऊन पाण्याच्या टाक्यांच्या जवळ जागा मिळते का बघायचा विचार केला. आम्ही टाक्यांजवळ जात असताना बुरुज आणि एक दरवाजा लागला. तिथून पुढे आल्यावर पाण्याचे टाके आणि गंगासागर तलाव लागला. गंगासागर तलावाच्या समोरच श्री रेणुका मातेची आणि गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती असलेले छोटेसे पण सुबक सुंदर मंदिर दिसले. रेणुका माता आणि गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेऊन राहण्याची जागा शोधण्यासाठी पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर पिण्याच्या टाक्याच्या १०-२० पावलं आधी आणि यज्ञकुंडाजवळ टेंट लावायला सुंदर जागा मिळाली. सचिन कुऱ्हाडेंनी पुढे जाऊन ही जागा शोधून ठेवली होती. थोडी जागा साफ करून टेंट लावून बॅगा त्यात ठेऊन दिल्या.
१०-१५ मिनिटे आराम करून भेळ आणि चहा बनवून घेतला. उजेडातच साल्हेर किल्ल्यावर पोहोचलो असल्याने काही जण सूर्यास्त आणि छोटे पण सुंदर असे परशुराम मंदिर बघण्यासाठी किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर गेले. तर उरलेल्या सर्वांनी हळूहळू जेवण बनवण्यासाठी सामानाची जमवाजमव सुरू केली. बाले किल्ल्यावर गेलेले सूर्यास्त बघून खालती आल्यावर मस्त सूप बनवले. सूप पिऊन जेवण बनवायला घेतले. जेवणात भात, शेवभाजी, पापड असा बेत होता. जेवण बनवण्याची जबाबदारी ऋषी जोशीची होती यावेळेस जेवण बनवणारा तो एकटाच होता. मागच्या ट्रेकला असलेला विवेक सिंग काही कामामुळे या वर्षी येऊ शकला नव्हता. त्यामुळे अक्षय भोसले हा ऋषीला मदत करण्यात सगळ्यात पुढे होता. बाकीचे पण होते. पण अक्षय सगळ्यात जास्त मदद करत होता. जेवण बनवत असताना काही जणांनी शेकोटी जाळण्याचे अथक प्रयत्न केले परंतु जेवण तयार झाले तरी असफलंच. त्यामुळे शेवटी नाद सोडून दिला, हो पण शेकोटी जाळण्यासाठी आम्ही जो जाळ केला होता (शेकोटी करण्यासाठी लागतो तेवढाच, वाटेल तसा नाही) त्यावर पाणी शिंपडून जाळ पूर्ण विझलाय आणि पुन्हा रात्री अपरात्री जोरदार हवा आली तर त्या वाऱ्यामुळे एखादी ठिणगी उडून किल्ल्यावर सर्वत्र असलेल्या सुक्या गवताला आग लागून वणवा पेटून आपल्या अनमोल ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्याचे नुकसान होऊ नये याची खात्री करून घेतली.
सुरुवातीला मी म्हणालो या किल्ल्याचा लढाईशी संबंध आहे. तर १६७१ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण मोहिम आखली. त्या मोहिमेत महाराजांनी ह्या परिसरातील किल्ले जिंकून घेतले. दिल्लीत औरंगजेबास जेव्हा याची वार्ता समजली तेव्हा त्याने इखलासखान आणि बहलोलखानास वीस हजारांची फौज घेऊन येथे पाठवले. इखलासखानाने साल्हेर किल्ल्याला वेढा घातला. महाराजांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी मोगलाईत गेलेल्या आपल्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांना फौज घेऊन साल्हेरला जाण्यास सांगितले तसेच पेशवे मोरोपंत पिंगळे यांना दुसऱ्या बाजूने चाल करण्यास सांगितले. जेणेकरून इखलासखान आणि बहलोलखानाची कोंडी करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. महाराजांच्या फौजेची आणि शत्रूची उघड आणि खुल्या मैदानात झालेली ही एकमेव लढाई असावी. खुल्या मैदानात झालेल्या या लढाईत महाराजांच्या फौजेने पराक्रमाची शर्थ केली. ही लढाई जिंकल्यामुळे स्वराज्याला हत्ती, घोडे, उंट, जडजवाहीर, कापड, तसेच इतर खजिना मिळाला.
हे सर्व झाल्यावर जेवण करून घेतले. जेवण झाल्यावर काहीजण टेंट जवळील साफसफाईला लागले. आम्ही काही जण भांडी घासण्यासाठी गेलो. सगळी कामे झाल्यावर सर्वजण आपापला टेंट पकडून झोपायला गेलो. झोपताना उद्या सकाळी बालेकिल्ल्यावर सूर्योदय आणि परशुराम मंदिर बघण्याचे ठरले. आज संध्याकाळी काही जण मंदिर बघून आले होते. पण बऱ्याच जणांचे मंदिर बघणे बाकी होते. सकाळी ७.१० चा सूर्योदय कलनिर्णयमध्ये दाखवत होता. त्यामुळे आम्ही काहीजणांनी ६.०० किंवा ६.१५ ला उठण्याचा निर्णय घेतला आणि झोपून गेलो. सकाळी ६.१५ ला मी, अभि बिरंबोळे, ऋषी जोशी उठून तयार झालो. तोंड धुवून आम्ही तिघे बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. अभि काल संध्याकाळी सूर्यास्त बघायला गेला होता. त्यामुळे आम्हाला रस्ता दाखवण्याचे काम करीत होता. कारण अजून अंधार होता. पण तो मस्त बूट घालून आला होता. मी आणि ऋषी मात्र फ्लोटर्स घालून गेलो होतो. मला बूट नसतील तर चढण चढताना आणि उतरताना तेवढा कॉन्फिडन्स नसतो जेवढा बूट घालून असतो. बालेकिल्ल्यावर जाताना अभि आम्हाला शॉर्टकट्सने घेऊन जात होता आम्ही आपले कसेबसे त्याच्या मागे जात होतो. साधारण १५-२० मिनिटात आम्ही परशुराम मंदिराजवळ पोहोचलो. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी श्री परशुरामांनी समुद्राला मागे हटवण्यासाठी जो बाण मारला तो याच भूमीवरून अशी लोकांची श्रद्धा आहे. परशुराम मंदिराच्या इथे आमच्या आधीच साधारण २५-३० लोकं होती. मी आणि अभि आमच्यात पहिले पोहोचलो तेव्हा आधीच आलेल्या एक ग्रुप कॉफी घेऊन आला होता किंवा त्यांनी तिथे बनवली होती. त्यातील एकाने अभिला विचारले,'दादा, कॉफी घेणार?' अभि कॉफी पीत नाही त्यामुळे त्याने नकार दिला. तेव्हा त्या मुलाने मला कॉफी पिणार का विचारले. मी त्याला म्हणालो,' नेकी और पुछ पुछ, चालेल'. त्याने साधारण मोठा अर्धा ग्लास भरून बऱ्यापैकी गरम कॉफी मला आणून दिली. गरमागरम कॉफी पिऊन मी आणि अभि व्हिडिओ काढण्यासाठी व टाइमलँप्स काढण्यासाठी मोबाइल सेट करण्यासाठी आम्ही त्या छोट्याशा बालेकिल्ल्याच्या टोकाजवळ गेलो तिथे अभिच्या मोबाईलवर टाइमलँप्स काढण्यासाठी एका दगडाला टेकून लावला आणि मी माझ्या मोबाईलवर शुटिंग घेण्यासाठी तयार झालो कारण आम्ही वेळ बघितली नव्हती. सूर्योदय व्हायला अजून साधारण १० मिनिटे बाकी होती. सूर्योदय होण्याच्या २ मिनिटे आधी मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली पण माझ्या सर्व मित्रांना माहित आहे थंडीत माझी हलत काय असते त्यामुळे अभि मला म्हणाला,' दादा, मला तुझा मोबाईल दे मी व्हिडिओ काढतो'. मोबाईल अभिच्या हातात देऊन आम्ही सूर्योदयाची आणि काही क्षणांचा असणारा आनंद अनुभवण्याची वाट बघत राहिलो. सूर्योदयाचा आनंद लुटून आम्ही गर्दी निघून जाण्याची वाट बघू लागलो कारण आम्हाला सुंदर असे परशुराम मंदिर बघायचे होते. बराच वेळ गेल्यानंतर शाहरुख, ह्रतिकच्या स्टाईलमध्ये फोटोशूट आणि रिल्स बनवणं संपवून आताची नवी पिढी हळूहळू बालेकिल्ल्यावरून उतरू लागली. तेव्हा कुठे आम्हाला परशुराम मंदिर बघण्याची संधी मिळाली.परशुराम मंदिर बघून आम्ही खालती टेंट लावलेले तिथे जायला निघालो. उतरायला सुरुवात केली तेव्हा आकाश आणि जगन मंदिर बघण्यासाठी येत असताना भेटले. आम्ही उतरताना अभिने या वेळेस आम्हाला सुरक्षित आणि चांगल्या रस्त्याने उतरवले. टेंटच्या इथे गेल्यावर आम्ही पटापट पोहे बनवायला घेतले. कारण पोहे आणि चहा पिऊन आमचा साल्हेर किल्ला उतरायला सुरुवात करण्याचे ठरले होते. कारण आम्हाला रात्री ११.०० पर्यंत डोंबिवलीमध्ये पोहोचायचे होते. १०.०० म्हणता म्हणता आम्ही साधारण ११.४५ ला आम्ही उतरायला सुरुवात केली. वाटत होते उशीर होणार. उतरताना मात्र आम्ही आलेलो त्या मार्गाने न उतरता साल्हेरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने उतरणार होतो. त्यामुळे त्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. दोन दरवाजे पार केल्यावर आम्ही थोडं खालती आलो तेव्हा तिथे एक बुरुज आणि तेथील तटबंदी पुन्हा बांधलेली दिसली.तिथेच एक मूर्ती आणि पावलांचे ठसे असलेले दोन दगड रचलेले छोटेसे मंदिर दिसले. ते बघून आम्ही पुन्हा उतरायला सुरुवात केली. जवळपास खालती पोहोचलोच होतो तिथे साल्हेरवाडीकडून वर जाताना दिसेल अश्या एका दगडात कोरलेले शिल्प दिसले. साधारण १.३५-१.४० ला आम्ही आमची गाडीजवळ येऊन पोहोचलो. पटापट फ्रेश होऊन आम्ही १.५५ ला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ४.०० च्या आसपास आम्ही दिंडोरीजवळ एका हॉटेलला जेवायला थांबलो. तिथे काहींनी शाकाहारी तर काहींनी मांसाहारी जेवणावर ताव मारला आणि पुन्हा परतीचा मार्ग पकडला. पण दिंडोरी येथे एक राजकीय नेता येणार असल्यामुळे ट्रॅफिक जॅम बराच वेळाने तिथून सुटलो नाशिक, इगतपुरी पार करून कसारा घाटात पोहोचलो आणि पुन्हा ट्रॅफिक जॅम ते सुटलो थोडे पुढे आलो तर वाशिंदजवळ ट्रॅफिक जॅम पण इथे मात्र आमच्या गाडीच्या ड्राइवर दादांना वशिंदमध्ये आतून वाशिंद पार करून पुन्हा हायवेला जाण्याचा रस्ता माहित होता त्यामुळे त्यांनी तिथून गाडी फिरवली आणि तिसऱ्यांदा ट्रॅफिक जॅममध्ये फसण्याचा आमचा योग टाळला. त्यामुळे आम्ही साधारण १०.३० ला डोंबिवलीला पोहोचलो.