Wednesday, 14 February 2024

अलंग मदन कुलंग



  दिवाळी झाल्यावर ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. दोन चार वेळा तारीख ठरवून बदलण्याची वेळ आली. नेहमीप्रमाणे आरंभी शूर भरपूर होते. पण सरते शेवटी १० जण नक्की झाले. पण ह्यावेळी कमी होण्यास मीही कारणीभूत होतो. कारण अलंग मदन कुलंग हा कठिण प्रकारातला ट्रेक आहे. त्यामुळे सर्वांना घेऊन जाणे कठिण होते.सर्वांना चढायला जमेल की नाही? नाही जमले तर अख्खा ट्रेक रहित करावा लागेल या विचाराने मी काहींना नाही म्हणालो होतो.

 दिनांक ०१/०२/२०२४ रोजी रात्रौ १०.५५ वा. ची कसारा ट्रेन पकडण्याचे ठरले.  मी, अक्षय, अभि बिरंबोळे, ऋषी बिरंबोळे, शुभम, सुमित, शौनक, विवेक, हृषी जोशी, अभि जोशी एवढे लोकं ठरल्याप्रमाणे निघालो. रात्रौ १०.०० ला सगळे सहनिवसातील मंदिराजवळ जमा झालो. सगळ्यांच्या सॅकमध्ये समान समान विभाजित करून सॅक भरल्या. रात्रौ १०.३० ला सगळे ठाकुर्ली स्टेशनला जमा झालो. स्टेशनला लक्षात आले की कोणी कांदे बटाटे घेतलेच नाहीत. कसाऱ्याला आम्ही गाडी सांगून ठेवली होती. त्या दादांना फोन करून कांदे मिळत असतील तर घेऊन ठेवायला सांगितले. मी असताना सुरळीत ट्रेक झाला तर आश्चर्यच. मी दरवेळी काही ना काही विसरतो. १०.५५ ची कसारा ट्रेन ११.२० ला आली. गाडीत असताना हृषी जोशीला लक्षात आले की ट्रेकला आणायचे तांदुळ तो घ्यायला विसरला आहे. झालं आता एवढा मोठा ट्रेक आणि जेवण बनवण्याचे महत्वाचे सामानच आम्ही विसरलो होतो. शेवटी नाश्ता करायला थांबू तेव्हा मिळाले तर बघू नाहीतर गावातून घेऊ असा विचार केला. १२.१५ च्या आसपास आम्ही कसाऱ्याला पोहोचलो. कसाऱ्याला आधीच गाडी बोलवून घेतली होती. गाडीवाले दादा येताच आम्ही अलंगच्या पायथ्याशी असलेल्या आंबेवाडी गावाकडे कूच केली. वाटेत बाबा का ढाबाला थांबून दाल खिचडी आणि कॉफी प्यायलो व धाबेवाल्याला विनंती करून करून धाब्यावरून दिड किलो तांदुळ घेतले. निश्चिन्त पुढील प्रवासाला निघालो. रात्रौ ०२.३०च्या आसपास आंबेवाडी गावात पोहोचलो. 


थोडा आराम करून आम्ही सकाळी ०६.०० वा. अलंग चढायला सुरुवात केली. मजल दरमजल चढत आम्ही ०९.०० वा. अलंग किल्ल्याच्या पहिल्या सोप्या प्रस्तरारोहणाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. सर्वांच्या सुरक्षेसाठी तिथे एक रोप लावून घेतला. सर्वांना वरती चढून दुसऱ्या आणि महत्वाच्या आणि कठिण प्रस्तरारोहणाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो. साधारण १०.०० वाजले होते. सर्व तयारी करून निसर्गदेवतेचे आवाहन करून अभिषेक जोशीने प्रस्तारारोहणास आरंभ केला. शांतपणे आणि कुशलतेने प्रस्तरारोहण केले. त्यानंतर शुभमने वर जाताना अभिने प्रस्तरारोहण करताना स्वतःच्या सुरक्षेसाठी बोल्टसमध्ये लावलेले quick draw काढले. अभिने रोप लावून घेतली. त्यानंतर सर्व सॅकस वर खेचुन घेतल्या व सर्वांना कमांडो पद्धतीने वर चढवून घेतले. वरील पायऱ्यांना अभिने दुसरा रोप अँकर करून सर्वांना वर जाण्यास मार्ग मोकळा करून ठेवला होता. शेवटी मी वरती आल्यावर अभिने वाईंड अप केले व तो वरती आला. किल्ल्यावर पोहोचल्यावर सर्वांना कडकडून भूक लागली होती. गुहेत गेल्यावर काही पाणी आणायला गेले तर काही मॅगी बनवायच्या तयारीला लागले. थोड्यावेळाने विवेक आणि हृषीने बनवलेली मॅगी खाल्ली नंतर चहा करून प्यायलो. तेव्हा कुठे सर्वांच्या अंगात एनर्जी आली. थोडा वेळ आराम करून रात्री भात आणि शेव भाजी बनवली. जेऊन सर्व आपापल्या टेंटमध्ये झोपून गेले. 


 दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० वाजता आम्ही मदनसाठी जाण्यास निघणार होतो. पण नेहमीप्रमाणे सगळे दमलेले असल्याने निघायला ९.०० वाजले. दुपारी जेवायला मिळणार नसल्यामुळे अलंग किल्ला सोडायच्या आधी आम्ही पोहे आणि चहा बनवला. पोटभर पोहे खाऊन आणि चहा पिऊन घेतला. अलंग किल्ल्याच्या प्रस्तरारोहण करण्याच्या ठिकाणी पोहोचलो. तिथे अभिने सगळा सेट अप केला. मी सर्वांना रॅपलिंग करायचे प्रात्यक्षिक दाखवले. माझ्या पाठोपाठ बाकी सर्वांनी



रॅपलिंग केले. शेवटी अभिने बोल्टमध्ये U टाकून रॅपलिंग केले. खाली उभा राहून मी शेवटी येणाऱ्या अभिला कंट्रोल केले. तिथून पुढे आम्ही छोट्या सोप्या प्रस्तरारोहण पॅचला आलो. तिथे सुरक्षेसाठी रोप लावून उतरून मदन किल्ल्याकडे प्रयाण केले. अलंग मदन किल्ल्याच्या घळीत पोहोचलो तेव्हा मदन करून कुलंग किल्ल्याला जाऊ शकतो का याबद्दल थोडी शाशंकता होती. पण इथे सारखे येणे होणार नाही हे माहित असल्यामुळे मदन किल्ला जाण्याचे ठरले. पण सगळ्या बॅग परत वर चढवून परत उतरवण्यात भरपूर वेळ गेला असता त्यामुळे मी मदन किल्ल्याच्या रॅपलिंग पॅचला खालतीच थांबण्याचा निर्णय घेतला. माझ्याबरोबर हृषीने बॅग्सजवळ थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे आधीच दुसऱ्या ग्रुपने सेट अप करून ठेवला होता त्यामुळे अभि कमांडो करून वर गेला. बाजूला आमचा सेट अप लावून बाकी ७ जणांना कमांडो करून वर घेतले. सगळे वर गेल्यावर सगळे वर जाऊन किल्ला बघून आले. मग मी आणि अभिने सर्वांना रॅपलिंग करून खालती उतरवले. तिथून आम्ही सगळे हृषी बॅग्स घेऊन जिथे बसला होता तिथे गेलो. सगळ्या बॅग्स घेऊन आम्ही कुलंग किल्ल्यावर जाण्याचा प्रवास सुरु केला. एव्हाना सायंकाळचे ४.०० वाजले होते. कुलंगला जाण्यासाठी आम्हाला साधारण ३ तास लागतील असा अंदाज होता.


पण तरुण मंडळी साधारण ६.०० वाजताच किल्ल्यावर पोहोचली. मी आणि हृषीला साधारण ७.०० वाजले. शेवटच्या पायऱ्या अंधारात चढाव्या लागल्या. पण सर्वजण सुखरूप या ट्रेकमधील शेवटच्या किल्ल्यावर पोहोचलो याचा आनंद होता. दुपारी जेवण न झाल्यामुळे सर्वांना कडकडून भूक लागली होती. कुरमुरे, फरसाण, मॅगी मसाला, लाल तिखट, मीठ, लिंबू काढून आमची स्पेशल चापचुप भेळ बनवली. पण या वेळेस भेळ बनवणारा शेफ बदलला होता. मागच्या ट्रेकला तेजसने ही कामगिरी पार पाडली होती. पण या वेळेस त्याच्या मुलीच्या शाळेत गॅदरिंग असल्याने त्यात तिचा डान्स असल्याने येऊ शकला नाही. त्यामुळे यावेळेस ही जवाबदारी शुभमने उचलली. पण त्यात सर्वांनी आपले सल्ले दिले खास करून सुमितने लाल तिखट अरे नुसता रंग आहे तू अजून टाक सांगून तिखट बनवून टाकली. भेळ सगळ्यांनी चाटून पुसून खाल्ली पण नंतर तिखट लागल्याने सर्वांनी बकणा भरून साखर खाल्ली. सगळे दमले होते. पण अभि जोशी सेट अप करून, सर्वाना बिले देऊन, वाईंड अप करून एवढा ट्रेक करून दमला होता. त्यामुळे तो आणि आता शरीराला सवय न राहिल्याने आणि तरुण वय न राहिल्याने मी पण थकलो होतो. आम्ही दोघे टेंटमध्ये जाऊन थोडा वेळ झोपलो. तोपर्यंत बाकी सर्वांनी सूप आणि जेवण बनवले. खासकरून हृषी आणि विवेक यांनी. सर्वांनी सूप पिऊन आणि मसाले भात खाऊन घेतला. अक्षय, सुमित आणि शौनक यांनी भांडी घासून आणि पाणी भरून आणले. सर्व आवरून सगळे झोपून गेलो. 

 रविवारी सकाळी ९.०० वाजेपर्यंत निघाण्याचे ठरले होते पण निघायला ११.०० वाजले. उठल्यावर सर्व बॅग्स आवरून विवेकने बनवलेले पोहे खाऊन आणि चहा पिऊन हळूहळू किल्ला उतरायला सुरुवात केली. तरुण मंडळी पटापट उतरून पुढे गेली. शेवटी मी, हृषी आणि अक्षय शेवटी होतो. आम्ही आमच्या कासवाच्या गतीने किल्ला उतरत होतो. उतरायला सुरुवात करताना


गाडीवाल्या दादांना आम्ही कुरुंगवाडी येथे येण्यास सांगितले होते. परंतु अर्धे उतरल्यावर लक्षात आले की तिथून एक वाट आंबेवाडी येथे जाते आणि एक वाट कुरुंगवाडी येथे जाते. आंबेवाडीकडे जाणारी वाट चांगली मळलेली होती कुरुंगवाडीला जाणारी वाट जास्त मळलेली नव्हती. बाकी सगळी मुलं आंबेवाडीच्या वाटेने पुढे गेली होती. पण गाडीवाल्याला सांगितल्यामुळे आम्ही कुरुंगवाडीचा रस्ता पकडला. तो ही रस्त्यात एक गावकरी मामा भेटले त्यांना विचारून त्यांनी सांगितले कुरुंगवाडीला तुम्ही अर्ध्या तासात पोहोचाल. उंचीवर असल्याने आम्हाला ते शक्य वाटत नव्हतं. एखाद तास लागेल या हिशोबाने आम्ही निघालो पण अर्धा पाऊण तास तंगडतोड करून देखील आम्ही त्या पठारावर आडवे चालत होतो. उतरायला रस्ता मिळत नव्हता. शेवटी चुकतोय हे लक्षात येताच आम्ही पुन्हा एकदा मागे जाऊन आंबेवाडीच्या रस्त्याला लागायचे ठरवले व मागे वळलो. आमच्या चुकीमुळे बिचाऱ्या अक्षयला उगाचंच तंगडतोड करायला लागली. पुन्हा वाटेला लागून खालती यायला आम्हाला ३.०० वाजले. सगळी मुले आमचीच वाट बघत

बसली होती. खाली पोहोचल्या पोहोचल्या आम्ही गाडीवाल्या दादांना फोन करून आम्ही उभ्या असलेल्या जागेवर यायला सांगितले. १५-२० मिनिटात दादा गाडी घेऊन आले. बॅगा वर टाकून आम्ही गाडीत बसलो आणि कसऱ्याला यायचा आमचा परतीचा प्रवास सुरु केला. कसऱ्याला आल्यावर स्टेशन बाहेरील हॉटेलमध्ये मिसळपाव, वडा उसळ पाव खाऊन पोटोबात लागलेली आग विझवली. कसारा स्टेशनला येऊन ५.०२ ची लोकल पकडली आणि वाट पकडली नैसर्गिक सुंदर जंगलातून काँक्रिटच्या कृत्रिम जंगलात पुन्हा प्रवेश करण्यासाठी. डोंबिवलीला उतरून सोडा पिऊन घरची वाट पकडली. साधारण ७.०० वाजता सुखरूप सहनिवसात पोहोचलो.

राजगड तोरणा लिंगाणा रायगड

 गणपतीनंतर नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. मागच्या वर्षी आम्ही किल्ले साल्हेर आणि सालोटा केले होते त्यामुळे यावर्षी किल्ले मुल...