Tuesday, 19 May 2020

पन्हाळा - पावनखिंड

सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ

दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
होय तनूची केवळ चाळण ... प्राण उडाया बघती त्यातून ... !
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! २

पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३

"पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. "

"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."

पावनखिंडीतला हा अविस्मरणीय असा एक अनुभव... लहानपणापासून मनावर कायमचा कोरला गेलेला...
आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी जावं असं ट्रेकला जायला लागल्यापासून वाटतं होतं. जाऊन आल्यानंतर तर ठिकाणाने मनावर वेगळीच भुरळ घातली.

 दिवाळीच्या दरम्यान आमच्या सहनिवसातील मुलांशी बोलणं झालं या ट्रेकबद्दल, त्यांनीही लगेच तयारी दर्शवली. त्याप्रमाणे आदित्य (आदि), तेजस, विक्रम (विकी), आशिष (आशु) यांच्याशी बोलल्यावर त्यांनी देखील येण्याची तयारी दर्शवली. साधारण १०-१२ मुलं जमा झाली. ट्रेकला आयत्या वेळी टांग देणारे बरेच बघितले होते. (यात कधीतरी माझं पण नाव असायचं. ट्रेकला कधीच नसेल पण इतर ठिकाणी फिरायला बऱ्याच वेळा असेल.) पण ऐन वेळी एकदम ४-५ जण येण्यासाठी तयार होतात हे मला तरी बघितल्याचं आठवत नाही. नाही म्हणता म्हणता या ट्रेकसाठी १९ जण झालो.
 आम्ही २४ डिसेंबरचं सह्याद्री एक्सप्रेसची तिकिटं काढली होती. ही ट्रेन कल्याणला संध्याकाळी ६.४५च्या आसपास आहे. १९ पैकी आम्ही १५ जणांनी कल्याणवरून ट्रेन पकडली. दोन जणं पुण्याला गेलेले ते तिथे ही गाडी पकडणार होते. अजुन दोन म्हणजे माझा मित्र विक्रम आणि त्याची पत्नी विधिश्री हे देखील कल्याणहून ट्रेन पकडणार होते. पण घरातून उशिरा निघाल्याने त्यांची ट्रेन सुटली. ट्रेकला यायची दांडगी इच्छा असल्याने त्याने २ तास कल्याण स्टेशनला थांबून पुढची ट्रेन (महालक्ष्मी एक्सप्रेस) पकडली आणि आम्हाला थेट कोल्हापूरला भेटले.
 कोल्हापूर स्टेशनजवळील बस स्टँडवरून पन्हाळा बस पकडली आणि पन्हाळ्याला पोहोचलो. खरंतर पन्हाळा आणि विशाळगड हे किल्ले न बघता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा सिद्दी जौहरने दिलेला वेढा फोडून विशाळगड जवळ करताना जो मार्ग वापरला तोच फक्त करण्याचं ठरलं होतं. पण किल्ल्यावरील सौंदर्य बघून मुलांना मोह आवरता आला नाही. त्यांनी किल्ला बघायचे ठरवले. सर्व मुलांचा पन्हाळा किल्ला बघून झाल्यावर पुसाटी बुरुजाजवळील तुटका नंदी येथे जमा झालो. (येथे एक नंदीची भग्न अवस्थेतील मूर्ती आहे म्हणून या परिसराला तुटका नंदी असे नाव असावे.) शिवरायांचा जयघोष केला आणि खाली उतरायच्या मार्गाने पन्हाळा किल्ला उतरण्यास सुरुवात केली. या मार्गाने थोडेच अंतर उतरले असू अचानक थोडा मार्ग यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलनात वाहून गेला होता. पण सुदैवाने पर्यायी मार्ग बनवण्यात आला होता. तिथून खाली उतरून मसई पठाराकडे वाटचाल सुरु केल्यावर लक्षात आले वय त्रास द्यायला लागलंय. दुसरी गोष्ट अशी की हा ट्रेक मी यापूर्वी ३ वेळा केला होता पण पावसाळ्यात तेव्हा हवामान खूपच सुंदर होतं. पण आता डिसेंबर अखेरीस देखील उन्हाचा जास्त त्रास जाणवत होता. खरंतर उन्हाचाच त्रास खूप जास्त होता. मसई पठाराजवळील वाडीत आमच्यातील काहींनी थोडेफार पाणी भरून घेतले आणि चालायला पुन्हा सुरुवात झाली. मसई पठारावर उन्हाचा त्रास अजूनच जास्त जाणवायला लागला. चालण्याचा वेग हळूहळू कमी होऊ लागला होता. दुपारी साधारण १ वाजता खाण्यासाठी कुंभारवाडा येथे थांबण्याचा विचार होता तिथे पोहोचायला आपल्याला साधारण अडीच तीन वाजले त्यात गावात पाण्याची कमतरता होती. आमच्या पुढे असलेल्या सर्वांना गावात बसवून आदि ३-४ जणांना घेऊन पाण्याच्या शोधार्थ पुढच्या मार्गाला लागला. जसे आम्ही गावात आलो आम्हाला पाण्याच्या कमतरतेबाबत समजले आणि पन्हाळा किल्ल्यावरच पाणी भरून न घेण्याच्या निर्णयाचा पश्चाताप झाला. तो निर्णय माझाच होता. यावर्षी पाऊस बराच उशिरापर्यंत पडल्यामुळे वाटेत पाणी सहज उपलब्ध असेल असा माझा अंदाज होता. म्हणून मी तो निर्णय घेतला होता. पण आता तो आमच्या कष्टात भर घालत होता. आदिने पुढे असलेल्या शाळेत जेवायला बसायची सोय केली पण आमचं दुर्भाग्य तिथेही पाणी खूपच कमी होते. हापसा होता पण पाणी खूपचं जड होते. त्यामुळे ते पाणी न पिता फक्त हात तोंड धुण्यासाठी वापरायचे ठरले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या तशीच होती. जेवढं होतं तेवढं पाणी सर्वजण पुरवून प्यायलो. पुढील वाटचाल सुरू केली. खोतवाडी/चाफेवाडी गावं ओलांडून पुढे गेलो तरी पाणी काही मिळेना. सर्वांनाच थकवा जाणवत होता. चालण्याची ताकतही संपत चालली होती. केळेवाडी गावाच्या आधी वाटेत एक घर दिसले तिथे पाण्यासाठी विचारणा केली तेव्हा त्या कुटुंबाने मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. आजच्या जमान्यात जिथे नाती सोबत राहात नाहीत तिथे त्या कुटुंबाने आमच्यासारख्या अनोळखी लोकांना योग्य वेळी मुबलक पाणी उपलब्ध करून दिले होते. तेव्हा ते कुटुंब साक्षात देवाप्रमाणे भासले. योग्य तेवढे पाणी प्यायल्यामुळे थकवा निघून गेला होता. तसेच संध्याकाळ होऊ लागल्याने ऊनही उतरू लागले होते. त्यामुळे पुढील वाटचाल जरा झपाट्याने होत होती तरीही आम्ही मुक्कामासाठी ठरवलेल्या आंबेवाडी या गावापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे उजेड असेपर्यंत जितके अंतर कापता येईल तितके अंतर पार करण्याचा निर्णय केला. कसेबसे आम्ही मांडलईवाडीपर्यंत पोहोचलो. 
 आदि सर्वांत पुढे असल्यामुळे ईतर मुलांशी बोलून त्याने एक निर्णय घेतला. गावातील एक माणुस घेऊन अंधारात विजेरीच्या (torch) साहाय्याने करपेवाडी अथवा त्याच्या आधीच्या धनगरवाड्यापर्यंत प्रवास लगेच करावा. जेणेकरून उद्या आम्हाला कमी अंतर पार करावे लागेल. आम्ही पोहोचलो तेव्हा त्याने हा निर्णय आम्हाला सांगितला. पण तेजसने या निर्णयाला विरोध दर्शवला. त्याचे कारणही योग्यच होते. आमच्यात असलेल्या लहान मुलांच्या आईवडिलांनी आमच्या जबाबदारीवर त्यांच्या मुलांना शरीराचा कस लावणाऱ्या या ट्रेकला पाठवले होते. (शरीराचा कस लावणारा ट्रेक म्हणजे एकूण ६४ किमी चाल, पण आम्ही फक्त पावनखिंडीपर्यंत म्हणजे साधारण ५५-५६ किमी मार्ग करणार होतो. या मार्गात मधेच डोंगर चढउतार, मधेच शेतं, मधेच डांबरी रस्ता, मधेच जंगल. आमच्या मागे कोणी लागले नसल्याने रात्री आराम करून आम्ही दोन दिवसात हा ट्रेक पूर्ण करणार होतो.) (पण विचार करा महाराजांनी हाच रस्ता भर पावसात, शत्रू मागावर असताना, सलग २१ तासात पार केला होता.) दुसरे म्हणजे मांडलईवाडी आणि करपेवाडी यातील अंतर ५ किमी होते तसेच वाटेमध्ये थोडे जंगल होते. आदिचा मुद्दाही बरोबर होता. आज जेवढे अंतर कापले जाईल तेवढे उद्याचे अंतर कमी होणार होते. दोघांनी माझ्यासमोर स्वतःची मते मांडल्यानंतर निर्णय माझ्यावर सोपवला. खरंतर आदिचा मुद्दा मला जास्त पटत होता. पण मी जर तसं सांगितलं असतं तर तेजस माझं डोकं खाणार हे मला माहित होतं. मी निर्णय मुलांवर सोडला. त्यांनीही चालायची तयारी दर्शवली. करपेवाडी हे गाव आम्ही मुक्कामासाठी ठरवलेल्या आंबेवाडी गावाच्या आधीचंच गाव होत; आणि करपेवाडीला जाणाऱ्या रस्त्यात जे जंगल होत तेही घनदाट नाही याचा मला अंदाज होता. मी स्वतः जंगलात फिरत असल्याने येथे रात्री चालण्यात कोणताही धोका नाही हे जाणून होतो. एक गावकरी जो करपेवाडीच्या आधी असलेल्या धनगरवाड्यात राहतो तो तिथे भेटला आणि शेवटी एकदाचा रात्रीचा ट्रेक सुरू झाला. (Night trek) साधारण एक सव्वा तासात करपेवाडीला पोहोचलो. जसे तिथे पोहोचल्यावर बॅग काढून ठेवली डोकं सोडून शरीरातील प्रत्येक अवयव दुखायला लागले होते. हात, पाय, खांदे, कंबर, पाठ सगळंच दुखत होतं. गावातच एका कुटुंबाला जेवण बनवायला सांगून तेथील शाळेच्या पटांगणात तंबू लावायला घेतले. तंबू लावून झाल्यावर थोडा आराम करेपर्यंत जेवण आलं. जेवण झाल्यावर सगळं आवरून झोपायला घेतलं. कारण सकाळी लवकर उठून पुढचा प्रवास चालू करायचा होता.
 सकाळी उठलो तेव्हा एकदम प्रसन्न वाटत होतं. हवेत थोडा गारठा होता पण अपेक्षेप्रमाणे थंडी नव्हती. हात पाय तोंड धुवून सकाळचे सर्व विधी आटोपून नाश्ता झाला. तरी नाश्ता उशिरा आल्यामुळे सकाळी निघायला उशीर झालाच. सुरुवातीला सर्वांची पावलं पटापट पडत होती. ऊन पडेपर्यंत सर्वांनी चांगला वेग पकडला. पण जसे ऊन वाढायला सुरुवात झाली तसा कालच्याप्रमाणे वेग कमी व्हायला लागला. रिंगेवाडीला पोहोचायला एक दीड वाजला. जेवण उरकून पुन्हा चालायला सुरुवात केली. (जेवण म्हणजे काय तर उरलेले थेपले आणि लोणचं व मॅगी) साधारण पावणे चारच्या आसपास म्हसवडे गावात पोहोचलो. सगळेच थकलेले कारण या मुलांनी एवढा मोठा ट्रेक कधी केला नव्हता. आम्ही मोठे बऱ्याच वर्षांनी ट्रेक करत असल्याने आम्ही पण थकलेलो. थोडा वेळ आराम केला. म्हसवडे गावानंतर थोड्याच अंतरावर पांढरपाणी हे गाव लागते. पण वाटेत एक डांबरी रस्ता लागतो तिथे उभे राहून गाडीची वाट बघू लागलो जी आम्हाला पांढरपाणी गावात सोडेल. वडाप तर मिळाली नाही पण सुदैवाने एक ट्रक थांबला. त्यामुळे डांबरी रस्त्यावरील चार पाच किमीची चाल वाचली. त्या पाच मिनिटाच्या प्रवासात सर्व थकवा निघून गेला. पांढरपाणीच्या चौकात एका हॉटेलमध्ये चहा, कॉफी, शीतपेय प्यायलो. याच हॉटेलात रात्रीच्या जेवणाची आणि हॉटेलाच्या पटांगणात रात्रीच्या झोपेची सोय केली. पावनखिंडीला जाण्यासाठी चौकशी केल्यावर असे समजले की पाचला शेवटची बस विशाळगडला जाते. ही बस आम्हाला पावनखिंडीजवळील बस स्टॉपवर सोडेल. बसची वाट बघत साडेपाच होऊन गेले होते. शेवटी एकदाची बस आली आणि शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली. पांढरपाणी येथून पावनखिंडीच्या जवळील बसथांब्यापर्यंत बसने गेलो.
 पावनखिंड ही जागाच अशी आहे की जिथे गेल्यावर सर्वांगावर काटा उभा राहतो. दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र मुसळधार पडणारा पाऊस, मधूनच चमकणाऱ्या विजा आणि सोबत होणारा त्यांचा कडकडाट. आजूबाजूला दाट झाडी पसरलेली. त्यातही श्वापदे.. पायाखाली धड रस्ता नाही. अरण्यातलीच वाट ती. अन् अशा वाटेने चाललेली ती ६०० मंडळी आणि दोन पालख्या! काय करत होती आणि कुठे निघाली होती अशा आडवेळेला आणि आडरानाला? रायाजी बांदल, फुलाजी प्रभू, बाजी प्रभू  सोबत ६०० मावळे, एका पालखीत शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीत महाराजांची वस्त्र अलंकार घालून शिवा काशिद. निघाले होते सिद्दी जौहरचा वेढा फोडून विशाळगड जवळ करायला. पण जौहरच्या हेरांनी पालखी हेरली. आता काय होणार?
  हेरलेली पालखी घेऊन १५-२० मावळे मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आड रस्त्याने विशाळगड जवळ करू लागली. पाठलाग अटळ होता, अन झालाच. सिद्दी जौहरचा जावई सिद्दी मसूद काही फौज घेऊन पाठलाग करू लागला. थोड्याच वेळात त्याने पालखीला गराडा घातला. त्याने मावळ्यांना विचारले आत कोण आहे? उत्तर मिळाले महाराज आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले. पालखी पन्हाळगडी नेण्यात आली. काही जाणकारांनी ओळखले. काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली आणि कळले की हा तर शिवा काशिद. शिवा काशिदचे शीर कलम करण्याचा आदेश देण्यात आला. 
  तो पर्यंत बाकीची मंडळी पुढे निघून गेली. सिद्दी मसूदने पुन्हा पाठलाग सुरू केला. गजापुरच्या आसपास सिद्दी मसूद जवळ पोहोचला. पुढे त्यातली अर्धी मंडळी पुढे गेली आणि अर्धी एका ठिकाणी थांबली. थांबलेल्यांनी केलं काय? येणाऱ्या शत्रूला तेसुद्धा ताज्या दमाच्या शत्रूला या थकल्या भागल्या जिवांनी पुढे कित्येक तास झुंजवलं एका खिंडीत आणि आपल्यासोबत त्या खिंडीलासुद्धा अजरामर केलं.. पावनखिंड!
बाजीप्रभू, फुलाजी प्रभू अन् त्यांच्या मावळ्यांनी सिद्दी मसूदच्या सैनिकांना जिथे रोखून धरलं ती पावनखिंड. रात्रभर चालून दमलेली ही लोकं कसल्या शक्तीने भारलेली होती की एवढय़ा अविश्रांत श्रमांनंतरसुद्धा पुढे सलग १०-१२ तास ती शत्रूशी झुंजली.. त्यांच्या राजासाठी त्यानं मांडलेल्या स्वराज्याच्या खेळासाठी स्वत:च्या जीवावर उदार होऊन गजापूरच्या खिंडीत ते लढले. ही गजापूर खिंड म्हणजेच 'पावनखिंड'.
तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!!!
 पावनखिंड बघून ते क्षण डोळ्यासमोर आणून बाजी, फुलाजी यांच्यासह प्राणाची बाजीलावून लढलेल्या प्रत्येक मावळ्याचं स्मरण करून त्यांना मनोमन वंदन करून परतीचा मार्ग पकडला.
या ट्रेकला माझ्यासोबत तेजस बांदेकर, आदित्य कानेटकर, विक्रम पवार, सौ. विधिश्री पवार, आशिष बिरंबोळे, अक्षय रासकर, शुभम खुजे, सुमेध खुजे, हृरिकेश जोशी, शुभम बोरवणकर, सुमित फडके, ऋत्विक लाड, अभिषेक बिरंबोळे, ऋषिकेश बिरंबोळे, अपुर्व देवकर, अक्षय भोसले, श्रेयस वैद्य आणि पार्थ वैष्णव हे माझे सवंगडी होते.
ऐतिहासिक माहिती स्रोत -: Google
फोटो स्रोत -: Google, आणि थोडे फार आम्ही काढलेले

Monday, 4 May 2020

सह्याद्रीतील पहिले पाऊल

 मी लहान असताना माझे मोठे भाऊ त्यांचे मित्र ट्रेकिंगला जातात हे बघितलं होतं. ट्रेकिंग म्हणजे काय माहित नव्हतं पण त्यांच्या तोंडून गोरखगड, माहुली, हरिश्चंद्रगड अशी नावं ऐकली होती आणि त्या नावांबद्दल मनात कुठेतरी एक आकर्षण निर्माण झालं होतं. तिथे जाण्याची खूप इच्छा होती. पण योग काही येत नव्हता. एकदा योग आला. मी साधारण आठवी नववीत असेन. (१९९५-९६) तेव्हा आई बाबा काही कामानिमित्त गावाला का कुठे बाहेर गेले होते. त्यामुळे घरी आम्ही तिघे भाऊच.आमच्या घरी मी, सागर (माझा मधला भाऊ) आणि बाकीचे मित्र बसलो होतो तेव्हा प्रकाश उर्फ पक्या याने 'माहुली' किल्ल्यावर ट्रेकला जाण्याची योजना बनवली. यात मी व माझ्या वयाच्या चार पाच मित्रांना पण घेऊन जाण्याची तयारी दाखवली. प्लॅन तयार झाला. आजच रात्री निघायचं आणि उद्या रात्री परत यायचं. संध्याकाळ संपून रात्र झाली. निघायची वेळ जवळ येत होती. सगळी तयारीसुद्धा झाली पण माझा मोठा भाऊ सिद्धार्थ अजून घरी आला नव्हता. (आता सारखे तेव्हा मोबाईल नव्हते त्यामुळे कुठे आहे? कधी येणार? काहीच विचारता येत नव्हते.) रात्री निघायची वेळ झाली तरी दादा घरी न आल्याने सर्वानुमते मी घरी थांबायचं आणि सागर व ठरलेले इतर सर्व (साधारण ९-१० जण) जाणार असं ठरलं. मी व आमचा एक मित्र असे दोघे घरी थांबून बाकीचे निघून गेले. ट्रेकला जाण्याची पहिली संधी हुकली त्यामुळे सगळे गेल्यावर रडून मी बेहाल झालो होतो. साधारण पाऊण एक तासाने दादा आला. माझं रडक थोबाड पुसून लगेच सायकलवर बसवून मला स्टेशनवर घेऊन गेला. पण गाडी आणि सहकारी निघून गेले होते. ही संधी हुकल्यानंतर अजून आठ नऊ वर्ष होय नाय करण्यातच गेली.
  एक दोन संधी हुकल्यानंतर आणि बरेच प्लॅन फसल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये पुन्हा एक प्लॅन झाला. 'हरिश्चंद्रगड' 'Paradise of Trekers' म्हणजेच 'गिर्यारोहकांची पंढरी' अशी ख्याती असलेला किल्ला. नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात प्लॅन केला ट्रेक करायचा. प्लॅन करणाऱ्या आमच्यात एक कौस्तुभ सोडला तर सगळेच अननुभवी किंवा तुटपुंजा अनुभव असलेले होते. कौस्तुभ तेव्हा एका संस्थेबरोबर ट्रेक करायचा आणि त्यांच्या ट्रेक प्लॅनिंग कमिटीमध्ये होता. ट्रेक प्लॅन तर केला पण घरून विरोध सुरू झाला जो मला अनपेक्षित होता. कारण दोघा भावांनी ट्रेक केले होते. मग मला विरोध का करावा? कारण आता लक्षात नाही कदाचित सगळेच अननुभवी असल्यामुळे असेल पण थोडा वाद घालून का होईना पण मी जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे सगळी तयारी झाली. सामान, कपडे इत्यादी भरून बॅगा तयार केल्या. दोन दिवसाचा ट्रेक असल्याने एक दिवस आधीच बॅगा भरून ठेवल्या होत्या. ठरलेल्या दिवशी म्हणजे दि. १८ नोव्हेंबर २००५ ला रात्री ठरलेल्या वेळेस निघालो. ट्रेन पकडून कल्याणला गेलो. कल्याणहून माळशेज घाट मार्गे जाणाऱ्या बसची चौकशी करून बस पकडली. साधारण दोन अडीच तासांनी माळशेज घाटाच्या पुढेच खुबी फाटा येथे उतरलो. खुबी फाट्याला नगरच्या दिशेने तोंड केल्यास रस्त्याच्या डाव्या हाताला खिरेश्वर गावात जायला वाट लागते ती पकडली आणि चालायला सुरुवात केली. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गावं. खुबी फाट्यावरून पिंपळगाव जोग धरणावरून खिरेश्वरला जावं लागतं. अर्धा पाऊण तास चालून खिरेश्वरला पोहोचलो. एव्हाना रात्रीचे तीन चार वाजले असतील. दोन तीन तास झोप काढून सकाळी सहा सातला गडावर जाण्यासाठी मार्गक्रमण करायचं ठरवून तिथे एका छोट्या हॉटेलच्या बाहेरील बाकड्यांवर झोप काढली.
ठरल्याप्रमाणे सकाळी उठून गड चढायला सुरुवात केली. जसं आम्ही गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली गावातील एक कुत्रा आमच्या मागे मागे यायला लागला. माझा हा पहिलाच ट्रेक असल्याने माझ्यासाठी हे नवीन होतं तसेच कुत्रे आणि माझा ३६चा आकडा असल्याने भीती वाटत होती. त्यामुळे आता दहा जण गडावर जाण्यासाठी निघालो. मजा मस्ती करत गड चढायला सुरुवात झाली. तोलार खिंडी मार्गे चढाव संपेपर्यंत एवढं दमायला झालं नाही पण शेवटी पाच का सात टेकड्या

पार करताना पार कंटाळा आला कधी एकदा पोहोचतोय असं झालं होतं. साधारण १०.०० - १०.३० च्या आसपास आम्ही एकदाचे गडावर पोहोचलो. एवढ्या उंचावर दगडांनी बांधलेलं सुंदर मंदिर, सुबक अशी पुष्करणी आणि कड्यात कोरलेल्या गुहा बघून आश्चर्यचकित व्हायला झालं. कारण हजारो वर्षांपासून या गडाचं अस्तित्व आहे. साडे तीन चार हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात या गडाचा उल्लेख आढळतो. असं म्हणतात की चांगदेव महाराजांनी येथे १४०० वर्ष तपश्चर्या केली. चांगदेव महाराज हे १४०० पेक्षा जास्त वर्ष जगल्याच म्हटलं जातं. (हा आता ही माहिती मला तेव्हा नव्हती. पण नंतर वाचन आणि मित्र परिवार यांच्या ज्ञानामुळे ही व अश्या अनेक गोष्टी माहिती होत गेल्या.) पण खरं सौंदर्य, खरं आश्चर्य तर बघायचं अजूनही बाकीचं होतं. आम्ही गुहांजवळ गेलो. तेव्हा गणेश गुहा रिकामी असल्याने तिथे जागा मिळाली. (या गुहेत कातळात श्री गणेशाचे १०-१२ फूट उंच सुंदर शिल्प कोरलेलं आहे.) या गुहेत थोडा आराम करून नाश्ता आटपून आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वर, पुष्करणी हा समोर दिसणारा मनमोहक परिसर बघायला गेलो.
१) हरिश्चंद्रेश्वर मंदिर -: हरिश्चंद्रेश्वर मंदिर म्हणजे मनहरखून टाकणारी जागा. कातळात कोरलेलं मंदिर, बाजूच्या परिसरात कातळात कोरलेल्या खोल्या आणि सर्वात अदभुत या मंदिर आणि खोल्यांच्या खालती भूमिगत अमृततुल्य पाण्याचा साठा. स्थानिक लोकं असं म्हणतात याच मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीच्या चौथरीच्या इथून खालती अजून एक खोली आहे त्याच खोलीत चांगदेव महाराजांनी १४०० वर्ष तपश्चर्या केली आणि 'तत्वसार' हा ग्रंथ लिहिला. 


  २) केदारेश्वर -: केदारेश्वर ही देखील येथील अप्रतिम कलाकृती. मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्यस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. 


  ३) पुष्करणी -: काही काही शब्दच मुळी गोड असतात, कानाला सुखावणारे असतात त्यातलाच एक 'पुष्करणी'. टाके, आड, बारव, विहीर, तलाव असे काहीही म्हटले तरी ती फक्त पाणी साठवण्याची जागा एवढेच डोळय़ांपुढे येते. पण तेच ‘पुष्करणी’ म्हटले तर! हे काहीतरी निराळे नक्कीच भासते. सुखद, अलंकारिक, दैवी, पवित्र, उदात्त हेतूने निर्मिलेली असे अनेक भाव त्या जलवास्तूत उमटू पाहतात. एखाद्या देवालयासमोर, त्याच्या सान्निध्यात, त्याच्यासाठी म्हणून निर्माण केलेला जलप्राकार म्हणजे ‘पुष्करणी’! आता तिच्या नावाप्रमाणेच ती सौंदर्य ल्यायलेली असणार हे उघड! चार दिशांना कोनाडे, त्यात विविध देवतांनी वास केलेला. आतमध्ये चारही बाजूने उतरणाऱ्या पायऱ्या, फिरण्यासाठी धक्का. पुष्करणीचे हे असे थोडेसे रेखीव रूप.


एवढं बघेपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्रीचं जेवण बनवण्याची तयारी सुरू केली. मी जेवण बनवलं तर उगाच सगळ्यांना उपवास घडायचा. त्यामुळे मी पाणी आणायचं आणि जेवण झालं की भांडी घासण्याचं काम करायचं ठरवलं. जेवण झाल्यावर मी आणि अजिंक्य गुहेच्या बाहेर मोकळ्यावर आडवे होऊन वर आकाश बघत बसलो होतो. एवढं स्वच्छ आणि छोट्या छोट्या चमकणाऱ्या ताऱ्यांनी भरलेलं आकाश मी कधी बघितलंच नव्हतं. सगळं आटपून झाल्यावर आम्ही शेकोटी पेटवून आमच्यातील स्वप्निल कुलकर्णी (आदित्य, अजिंक्य कानेटकर यांचा मावसभाऊ) महाराजांवरील गाणी म्हणू लागला आणि आम्ही त्याला साथ देऊ लागलो. साधारण अर्धा तास गाणी म्हणून झाली असतील तेव्हा आमच्यातील कोणाचं तरी लक्ष मंदिराकडून गुहेकडे येणाऱ्या वाटेवर गेले. त्या वाटेवर अंधारात दोन डोळे चमकताना दिसले. त्याने आम्हाला दाखवलं आणि आम्ही बघत असताना त्या चमकणाऱ्या डोळ्यांच्या काही फूट पुढे अजून दोन डोळे चमकू लागले. आता मात्र आमचं घामट निघायला लागलं होतं. कारण हरिश्चंद्रगड आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा राजूर वनपरिक्षेत्रात येतो. त्यामुळे कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी येथे आढळतात. सर्वांनी टॉर्च मारून बघितलं तेव्हा समजलं त्या छोट्या रानमांजरी होत्या आणि हे समजल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. मग थोडावेळ भीती घालवण्यासाठी परत गाणी वगैरे म्हणून झोपायला गेलो. सकाळी उठून तारामती शिखर आणि निसर्गाची अप्रतिम रचना म्हणजेच कोकणकडा बघायचं ठरवलं होतं.

 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रातर्विधी वगैरे आटपून चहा नाष्टा करून तारामती शिखर आणि कोकणकडा बघण्यासाठी निघालो. 
 ४) तारामती शिखर -: तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची साधारणत ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुहेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. (याच गुहेत आम्ही राहत होतो.) याच गणेश गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाइनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.
 ५) कोकणकडा -: कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे "इंद्रव्रज" दिसल्याची नोंद आहे. 'इंद्रव्रज' म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. पावसाळ्यात ठराविक परिस्थितीत इंद्रवज्र दिसते.
 तारामती शिखर आणि कोकणकडा बघेपर्यंत दुपार झाली होती. ऊन भरपूर वाढलं होतं. परत गुहेत जाऊन जेऊन परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. त्यामुळे मन होत नसताना देखील गुहेत आलो. जेवण करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. गड उतार होताना मागे वळून काल आजच्या आठवणी डोळ्यात साठवून आणि सह्याद्रीशी जुळलेलं हे नातं तुटू न देण्याचं मनाशी पक्क करून चालायला सुरुवात केली. उतरताना मी आणि अजिंक्य सगळ्यात पुढे होतो. बाकीचे जास्त मागे नव्हते साधारण हाकेच्या अंतरावर असतील. गाव जवळ यायच्या आधी मला आणि अजिंक्यला दहा पंधरा फूट पुढे दोन अडीच फुटाची आकृती वळवळत आमच्या समोरुन जाताना दिसली मी आणि अजिंक्यने धावत जाऊन बघितलं तर एक काळा अंगावर सफेद आडव्या पट्टया असलेला साप होता. तेव्हा सापांबद्दल माहिती नसल्याने तो कोणता? विषारी की बिन विषारी हे माहित नसल्याने कोणताही आगाऊपणा न करता बाकीच्यांना पण तो बघता यावा म्हणून त्यांना आवाज दिला. ते धावत आले देखील पण तो पर्यंत तो साप झुडपात दिसेनासा झाला होता. (नंतर काही वर्षांनी समजलं की तो मण्यार जातीचा विषारी साप होता.) त्यामुळे पुन्हा चालायला सुरुवात करून गाव गाठलं. गावात एका हॉटेलात चहा नाश्ता करून खुबी फाटा गाठला. खुबी फाट्याला बसची वाट बघू लागलो पण बराच वेळ बस न आल्याने दिसेल त्या गाडीला हात दाखवून थांबायचा प्रयत्न केला. शेवटी एक भाजीचा टेम्पो थांबला व त्याने शहाड, कल्याण पर्यंत सोडण्याचे कबुल केल्यावर आम्ही टेम्पमध्ये भाजीच्या गोण्यांवर बॅगा आणि अंग अक्षरशः टाकून दिलं. दमलेलो असल्याने झोप लागली आणि शहाड कधी आलं समजलंच नाही. 
या ट्रेकला माझ्यासोबत कौस्तुभ खडीकर, आदित्य कानेटकर, अजिंक्य कानेटकर, स्वप्निल कुलकर्णी, स्वप्निल भावसार, प्रसाद निगडे, हृषीकेश कारखानीस आणि गौरव पांढरकामे हे माझे सवंगडी होते.
ऐतिहासिक माहिती स्रोत -: www.trekshitiz.com, 
Google
फोटो स्रोत -: Google, श्री. संजय लोकरे आणि काही आम्ही काढलेले 
हरिश्चंद्रगड नकाशाची लिंक -: हरिश्चंद्रगड नकाशा

राजगड तोरणा लिंगाणा रायगड

 गणपतीनंतर नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. मागच्या वर्षी आम्ही किल्ले साल्हेर आणि सालोटा केले होते त्यामुळे यावर्षी किल्ले मुल...