१६ तारखेला रात्री १.०० ला (तसं पाहिलं तर १७ तारीखच लागली होती) ट्रेकला जाण्यासाठी खालती उतरलो तर समोर तेजस, तेजसचा मेहुणा प्रथमेश (सगळे त्याला गण्याचं म्हणतात), तेजसचा एक भाऊ संतोष तसेच आमच्या सहनिवासातील अशोक कोंड आणि सुहास पाटिल काका. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. खोपोली पाली मार्गे ताम्हिणी घाटात जाण्यासाठी आम्ही निघालो. वाटेत खोपोलीजवळ चहा पिण्यासाठी थांबलो. चहा पिता पिता गरमागरम कांदाभजी मिळेल हे दिसले तेव्हा कांदाभजी मागवून सगळ्यांनी त्यावर ताव मारला. चहा आणि कांदाभजीचा आस्वाद घेऊन पुढिल प्रवासाला सुरुवात केली. साधारण ५.०० वाजता आम्ही ट्रेकर्स पॉईंट हॉटेलला पोहोचलो जिथे तेजसने चहा नाश्ता, जेवणासाठी आणि वाटाड्यासाठी सांगून ठेवले होते. पहाटेचे ५.०० वाजले असल्याने प्रवासाचा क्षीण घालवण्यासाठी तास भर आराम करण्यासाठी हॉटेलवाल्याकडून चटई घेऊन सगळे पसरलो. सगळे झोपण्याचा प्रयत्न करत असताना अचानक आवाज यायला लागला इथे तिथे बघितल्यावर आमच्या लक्षात आले गण्या भाऊ घोरायला सुद्धा लागले होते. त्याच्या घोरण्यामुळे कोणालाच झोप येईना. हळूहळू सगळे बसून गप्पा मारायला लागले. मी झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहिलो पण नशिबी अपयशच. शेवटी मी पण उठून बसलो आणि गप्पांमध्ये सामिल झालो. तासाभराने गण्या भाऊ उठले तेव्हा सर्वांनी गण्यावर झोड घेतली. ७.०० च्या आसपास नाश्ता तयार झाला तो करून चहा पिऊन आम्ही अंधारबन ट्रेकला सुरुवात केली. आता ट्रेकला वर्दळ वाढल्यामुळे वनविभागाने ट्रेकच्या सुरुवातीला एक चौकी बसवली आहे. जिथे १४०/- ₹ ची पावती भरून ट्रेकला सुरुवात केली.
५-६ किमी चा ट्रेल करून परत यायचे ठरले होते. साधारण ८.०० ला चालायला सुरुवात केली. आमच्या आधी अंदाजे ६ ग्रुप पुढे गेले होते. मजा मस्ती करत आम्ही चालत होतो. मला थोडेफार वन्यजीवांचे ज्ञान असल्याने माझे लक्ष वन्यजीव अथवा त्यांच्या खुणा शोधण्यात जास्त असते. एका ठिकाणी मला पायांचे ठसे दिसले. परंतु त्या ठस्यांच्या काठावर माणसांच्या चालण्यामुळे त्यांचे ठसे दिसत होते. माझे जेवढे ज्ञान आहे त्यानुसार माझा अंदाज होता हे ठसे बिबट्या मादीचे असावेत जी पहाटे ५-६ च्या आसपास तिथून गेली असावी. पण ट्रेकला बऱ्याच वेळेस माणसांबरोबर गावातील कुत्रे सुध्दा येतात त्यामुळे मी थोडा गोंधळात होतो. बिबट्या आणि कुत्र्याच्या पावलांच्या ठस्यांत थोडाच फरक असतो. तसेच कुत्र्याच्या पावलांच्या ठस्यांत बोटांपुढे नखांचे निशाण दिसतात कारण कुत्रे आपली नखे मागे घेऊ शकत नाहीत. मांजरीच्या सगळ्या जाती (यात आपण नेहमी बघतो ती मांजर असो की मग वाघ, सिंह, बिबट्या असो) आपली नखे मागे घेऊन लपवतात. शिकार करताना अथवा लढाई करताना मांजरी आपली नखे बाहेर काढतात. त्यामुळे नेहमीच्या चालण्यात त्यांच्या पायांच्या ठस्यांत नखे दिसत नाहीत. ठस्यांच्या आकारावरून तरी ती बिबट्याची मादीच असावी असे मला वाटत होते पण बोटांच्या ठिकाणी माणसांच्या पायाचे ठसे असल्याने तिथे नखे दिसत नव्हती. शेवटी विचार करून पुढे चालायला सुरुवात केली. आम्ही अंधारबन व्ह्यू पॉईंटला पोहोचलो.
येथून कुंडलिका व्हॅलीचे दर्शन केले. तिथे निसर्गाचा आस्वाद घेऊन थोडीफार फोटोग्राफी करून परत यायला निघालो. एव्हाना गर्दी वाढायला लागली होती. दोन तीन दिवसांपासून या परिसरात पाऊस पडला नसल्याने उकाडा वाढला होता. पण वाटेत २-३ धबधबे ओहोळ चालू होते त्यामुळे त्यात भिजण्याचा प्लॅन बनला. परतत असताना मला बिबट्याची विष्ठा दिसली. तीही ताजीच असल्यामुळे मगाशी माझ्या मनात आलेला संशय पूर्णपणे मिटला होता. मी पाहिलेले पायांचे ठसे हे बिबट्या मादीचेच होते. तिने पहाटे ५-६ च्या सुमारास तिथून मार्गक्रमण केले होते आणि तिने एक वानर खाल्लं होतं. त्यामुळे तिच्या विष्ठेचे निरीक्षण करताना मला त्यात वानराचे केस आणि काही हाडांचे तुकडे सापडले.
फोटो काढून आम्ही तिथून पुढे निघालो आणि आम्हाला येताना लागलेल्या पहिल्या धबधब्याच्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही पोहोचलो तेव्हा एक मोठा ग्रुप तिथे भिजण्याचा आनंद घेत होता त्यामुळे आम्हाला पाण्यात जाता येत नव्हते. पाच एक मिनिटात त्यांनी तिथून जायला सुरुवात केली आणि आम्ही प्रसन्न झालो. ते तिथून गेल्यावर आम्ही (मी सोडून) सगळे पाण्यात उतरून धबधब्यात भिजण्याचा आणि खाली जमा झालेल्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेऊ लागले.
थोडा वेळ तिथे मजा करून आम्ही हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. साधारण ११.०० ला आम्ही पुन्हा हॉटेलला पोहोचलो. फ्रेश झाल्यावर साधारण १२.०० ला चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. थोडा वेळ टाईमपास करून सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट बघायला जाण्याचा मार्ग हॉटेलवाल्यांना विचारून तिथे जाण्यासाठी निघालो.
साधारण अर्ध्या पाऊण तासात आम्ही बेसच्या पाड्यात पोहोचलो. गाडीतून उतरल्या उतरल्या एकाने जाताना भरपूर पाणी घेऊन जा येताना पाण्याची कमतरता जाणवते असे सांगितले. त्यामुळे आम्ही सहाजणात साधारण ७-८ लिटर पाणी घेतले. त्याबरोबर तेजसने भेळ बनवण्यासाठी सामान आणले होते ते घेतले आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. ह्या परिसरात दोन तीन दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने रखरखीत ऊन पडले होते. दुपारचा साधारण एक वाजला होता. उतार उतरून जायचे होते. उतरायला सुरुवात केली मजा मस्करी करत आम्ही चालत असताना सुहास काकांना फोन आला बोलण्याच्या नादात ते आमच्यापेक्षा मागे पडले आम्ही ही मजा मस्करी करण्यात गुंग असल्याने आमच्या ते लक्षात आले नाही. थोडे पुढे गेल्यावर आमच्या लक्षात आले काका दिसत नाहीत. तेव्हा मागून तेजसने मला विचारले काका पुढे गेले आहेत का? मला लक्षात होते काका फोनवर बोलत होते. पण मागेच होते त्यामुळे मी त्याला तसे सांगितले त्याने काकांना आवाज द्यायला सुरुवात केली दोन तीन हाका मारल्यावर काकांचा मागून आवाज आला तुम्ही जाऊन या मी इथेच थांबतो. तिथून पुढे निघणार तोच गण्याने ही पुढे यायला नकार दिला. त्याला काकांजवळ जाण्यास सांगून त्यांना पाण्याची एक बाटली देऊन ठेवली. शेवटी मी, तेजस, अशोक आणि संतोष दादा असे आम्ही चौघे पुढे निघालो. हळूहळू आम्ही पुढे जात होतो कारण आमच्या आधी तिथे गेलेले बरेचसे ग्रुप परत येत होते. वाटा छोट्या, काही ठिकाणी खडकाळ, तर काही ठिकाणी निसरड्या असल्यामुळे काही ठिकाणी एक एक जण जाऊ शकत होता. त्यामुळे शेवटच्या पॉइंटला जायला आम्हाला २.०० वाजले. तिथे गेल्यावर तिथून दिसणाऱ्या रिंग धबधबा, देवकुंड धबधबा, बिरा धरण कुंडलिका व्हॅली बघून फोटोग्राफी केली.
निसर्गाचा आनंद घेऊन एक तासाभरात आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हळूहळू सांभाळून चालत असताना एका निसरड्या वाटेवर संतोष दादा घसरून पडला. त्याला विचारल्यावर बघितल्यावर गंभीर दुखापत नसल्याचे समजले. कोपराला आणि अजून एखाद ठिकाणी हलकेसे खरचटले होते. आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. आमचा अंदाज होता आता वर चढून जाताना जास्त वेळ लागेल. पण परत जाताना गर्दी नसल्याने आम्ही साधारण अर्धा पाऊण तासात काका आणि गण्या बसलेले तिथे पोहोचलो. तिथे गेल्यावर थोडा आराम करून तेजसने आणलेले भेळीचे सामान बाहेर काढून भेळ बनवण्याचा निर्णय घेतला.
गण्या, काका आणि तेजस यांनी मिळून भेळ बनवली. भेळ खाऊन परत थोडा आराम करून आम्ही गाडी पार्क केलेल्या घराजवळ परत आलो. तिथे बसून त्या घरातील मावशींना लिंबू सरबताची ऑर्डर दिली. सरबत पिऊन थोडा टाईमपास करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. थोडं पुढे गेलो तो हलका पाऊस सुरू झाला पण तो ही थोडा वेळच. साधारण १०.३० च्या आसपास आम्ही घरी पोहोचलो.











Mast!
ReplyDeleteमस्तच प्रवास वर्णन 👏
ReplyDeletebhari 1 no. ...... i missed...........from vishal
ReplyDelete