साधारण ५-६ ऑक्टोबर २०१२ ला मी एक ट्रेक करायला गेलो होतो. त्या ट्रेकला जाण्या अगोदर मला एक मोठा इव्हेंट आहे हे समजलं होतं. माझे दोन मित्र (अजिंक्य कानेटकर आणि दिनेश रुपारेल) त्या इव्हेंटला जाणार होते. मला त्यांचा अभिमान होता पण मनात कुठे तरी खंत होती त्या इव्हेंटला मला जाता येणार नसल्याची. अर्थात तिथे काम करायला जाणारी सगळी मातब्बर मंडळी होती. त्यामुळे उदास मनाने मी ट्रेकला गेलो. जाताना जरी उदास असलो तरी तिथे गेल्यावर मात्र ट्रेक एन्जॉय केला. ६ ऑक्टोबरला रात्री मी ट्रेक करून थकुन घरी आलो. सगळं आवरून झोपून गेलो.
दुसऱ्या दिवशी साधारण ११.०० - १२.०० वाजता माझा एक मित्र (खरं तर गुरू) दिनेश रुपारेल याचा फोन आला. त्याने फोन वर विचारलं, "सुदर्शन, एक इव्हेंट आहे. करशील का?" मी पुढचा मागचा कोणताही विचार न करता त्याला होकार देऊन टाकला. तो म्हणाला, "अरे पण कोणता इव्हेंट आहे? काय काम आहे? किती पैसे मिळणार? हे तर बघ". मी त्याला विचारलं, "तू तिथेच आहेस ना? त्याच इव्हेंटला यायचं आहे ना?" तो म्हणाला," हो". तेव्हा मी त्याला म्हणालो, "मग तर मी नाही म्हणूच शकत नाही. मला माहित आहे कोणता इव्हेंट आहे. पैसे कमी मिळाले तरी काही हरकत नाही". आम्ही दोघं हसलो. तो म्हणाला लगेच आवर आणि संध्याकाळ पर्यंत रिलायन्स स्टुडिओ, फिल्म सिटीला ये. मी लगेच आईला सांगितलं एक इव्हेंट आला आहे. मला निघायचं आहे. लवकर जेवण वाढ. मी ४-५ दिवसांनी येईन. जेऊन लगेच निघालो. दुपारी लवकरच तिथे पोहोचलो.
सुदैवाने मी सगळे तिथे असतांनाच तिथे पोहोचलो. सगळे वाईंड अप करून निघायच्या तयारीत होते. वाईंड अप करून मी सगळ्यांबरोबर रेस्ट घ्यायला ऑफिसला गेलो. जिथे आमची राहण्याची सोय केली होती. थोडा वेळ आराम करून आम्ही सगळे संध्याकाळी ७.०० च्या आसपास परत स्टुडिओला गेलो. आम्ही सेट अप करून रेडी झालो. खालती स्टेजवर काही डान्सर्स डान्सची प्रॅक्टिस करत होते. थोडं या इव्हेंट विषयी सांगतो. हा एक डान्स इव्हेंट होता जिथे डान्सर्स ना (Aerial rigging) सेफ्टीची काळजी घेऊन वरून खाली उतरवायचे, वर घायचे किंवा त्यांच्या डान्स स्टेप्स होई पर्यंत हवेत हँग करून ठेवायचे. तर ह्या सगळ्याची तयारी करून झाल्यावर आम्ही जेवण करून घेतलं. रात्री साधारण १२.०० - १२.१५ वाजता डान्स कोरीओग्राफरने आम्हाला वॉकी टॉकीवर मिटिंगसाठी खालती येण्याचा मेसेज दिला. आम्ही सर्व कामं संपवून लगेच खालती गेलो. कोरीओग्राफरने स्टेजवर कोणता डान्सर कुठून खालती येणार अथवा त्याला कुठे हँग करायचं हे सांगितलं. मग तिथेच स्टेजच्या खालती आम्ही जमिनीवर बसलो. एका खुर्चीवर कोरीओग्राफर (मयुरी उपाध्याय - Nrutrutya Dance Company) आणि एका खुर्चीवर आम्ही ज्या कंपनीसाठी काम करत होतो त्या कंपनीचा मालक (अविष्कार तेंडले - Natura Aerial Rigging Company) असे बसले. कोणत्या क्षणाला कोणत्या डान्सरला खालती घ्यायचे कोणाला वर घ्यायचे हे गाणं ऐकत ऐकत आम्ही लक्षात ठेवत होतो.
तेव्हढ्यात अचानक बाहेरून डोक्यावर टोपी, ट्रॅक सूट आणि ट्रॅक सूटच्या दोन्ही खिशात हात घालून सव्वा सहा फुटाचा तो कलाकार आला. ज्याला फक्त बघण्यासाठी मी या इव्हेंटला येण्यासाठी होकार दिला होता. जसा हा कलाकार आत आला सगळे उठून उभे राहिले. त्याला कोरीओग्राफरबरोबर काहीतरी बोलायचे होते. तो बोलायला गेला पण जेव्हा त्याच्या लक्षात आले आमची मिटिंग चालू आहे. त्याने क्षमा मागितली व तो बसण्यासाठी जागा शोधू लागला. बरेच जण त्याला बसण्यासाठी सोफा, खुर्ची शोधायला गेले. पण तोपर्यंत हा कलाकार आमच्या सारखा खाली जमिनीवर बसलादेखील. एवढा मोठा कलाकार पण आम्हा सामान्य लोकांबरोबर तो खाली बसला. त्याच्यासाठी नंतर सोफा, खुर्ची सगळं आणलं. पण तरी आमची मिटिंग संपेपर्यंत साधारण अर्धा तास हा कलाकार खालीच बसून राहिला. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून सिने सृष्टीचा शहेनशहा जो ८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते आजतागायत सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय तो दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन. ज्यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिम्मित एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचं नाव होतं *B 70*. ज्यात त्यांच्या ७० सिनेमांचे मोठे पोस्टर लावले होते. तसेच पंडित हरिवंशराय बच्चन यांची एक प्रसिद्ध कविता *मधुशाला* वर २० मिनिटांचा डान्स होता. जी कविता खुद्द अमिताभजींनी गायली होती. त्यांना बघण्याचं माझं स्वप्न आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं. कलाकार म्हणून अमिताभ जेवढा मोठा तेवढाच माणूस म्हणूनही.
आमची मिटिंग संपवून आम्ही वर आमच्या कामाच्या ठिकाणी गेलो. अमिताभ पण कोरीओग्राफरबरोबर बोलून थोडी प्रॅक्टिस करून निघून गेला. पहाटे ४.०० वाजता सगळं आवरून आम्ही आमच्या राहायच्या ठिकाणी झोपायला निघून गेलो. पुढचे दोन दिवस दुपारी आम्ही पुन्हा जेवणाच्या वेळेस स्टुडिओला जायचो. जेवण झाल्यावर आम्ही कामाला सुरुवात करायचो. रात्री साधारण पावणे दोनला अमिताभ बच्चन यायचे. ४.०० वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून अमिताभ निघून जायचे. ९ तारखेला रात्री फायनल रिहर्सल होती तेव्हा सर्व डान्सर्स आणि अमिताभ यांनी एकत्र डान्स केला. दोनदा रिहर्सल केल्यावर सर्व डान्स टीम, मॅनेजमेंट टीम इतर सर्व अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढून घेत होते. आम्ही बिचारे वाईंड अप करण्यात व्यस्त होतो. तेव्हा आमच्यातील खाली उभे असलेले सहकारी अविष्कारला म्हणाले आपल्या टीमचा पण फोटो काढायचा आहे. कोरीओग्राफरला सांगून आमच्या टीमचा पण फोटो काढण्यासाठी विचारणा केली. अमिताभ स्टेजवर होते आणि आम्ही खाली उभे होतो. जसा होकार मिळाला आम्ही स्टेजवर गेलो. जात असताना दिनेश भाई माझ्याजवळ येऊन म्हणाला, "सुदर्शन तू त्याच्या बाजूला उभा रहा. छान दिसेल लंबू टिंगू". का कोणास ठाऊक पण मला वाटत होतं की अमिताभजींने ते ऐकले असावे कारण दिनेश भाई एकतर एकदम हळू आवाजात बोलला नाही आणि त्याने असे म्हटल्यावर अमिताभजींनी मला वरून खालपर्यंत बघितलं आणि हलकीशी स्माईल दिली. पण मी काही त्यांच्या बाजूला उभं राहायची हिम्मत केली नाही. फोटो सेशन झाल्यावर आम्ही वाईंड अपचं काम संपवून निघून गेलो.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० तारखेला प्रॅक्टिस नव्हती. रात्री ११.०० ला आम्हाला परफॉर्मन्स करायचा होता. पण गेस्ट एवढे जास्त होते की दोनदा परफॉर्म करायचं ठरलं. दुपारी सर्व तयारी करून आम्ही परफॉर्मन्सच्या वेळेची वाट बघू लागलो. परफॉर्मन्स व्यवस्थित झाला. डान्सर्सने सुंदर डान्स केला आणि आमच्या टीमने पण त्यांना उत्कृष्ठ सहकार्य केलं. गेस्टस असल्यामुळे आम्ही वाईंड अप करून वरतीच बसून राहिलो. प्रोग्रॅम संपल्यावर सगळं सामान गाडीत भरून ऑफिसमध्ये पाठवून देऊन आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यावर स्वप्नपूर्ती झाल्यामुळे सुखाने झोपलो.
No comments:
Post a Comment